जिल्ह्यात ४६ मलेरिया रुग्ण : आरोग्य विभागाची उल्लेखनीय कामगिरी, कीटकजन्य आजारावर नियंत्रणभंडारा : अस्वच्छतेच्या व डासांच्या प्रकोपामुळे सर्वत्र आजाराचे थैमान आहे. जिल्हा हिवताप कार्यालयाने जानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्यात जिल्ह्यातील दोन लाख २९ हजार ८०४ नागरिकांचे रक्तनमुने घेतले. यात केवळ ४६ नागरिकांचे रक्त नमुने दूषित आढळून आले आहेत. जिल्ह्यातील आरोग्य विभाग विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी उल्लेखनीय कार्य करित असल्याचे यावरून सिद्ध होते. दरवर्षी पावसाळ्यात विविध आजारांची मोठ्या प्रमाणात लागन होते. यात डेंग्यु, मलेरिया या आजारांचा मोठा सहभाग असतो. या आजार ग्रस्तांना औषधोपचार करताना आरोग्य विभागाची दमछाक होते. त्यामुळे यावर्षी आरोग्य विभागाने विशेष काळजी घेत या आजाराचा प्रकोप होणार नाही, याबाबत विशेष काळजी घेत आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून डेंग्यु डासअळी शोध मोहिम राबवून वेळीच त्यावर नियंत्रण मिळविले. यामुळे मलेरियाची लागन झाल्याचा संशय घेऊन आरोग्य विभागाने सुमारे दोन लाख २९ हजार ८०४ नागरिकांचे रक्तनमुने घेतले असले तरी त्यात केवळ ४६ रुग्णांना याची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात प्लाझ्मोडियम व्हायवेक्सचे (पीव्ही) ३० रुग्ण तर फाल्सीफेरमचे (पीएफ) १६ रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य विभागाने राबविलेल्या यंत्रणेमुळेच यावर्षी जिल्ह्यात मलेरियासह अन्य आजाराने डोके वर काढले नसल्याचे आरोग्य विभागाचा दावा आहे. भंडारा शहरातील ११ हजार ८३० रुग्णांची रक्त नमुना चाचणी घेतली. त्यात दोन रुग्ण पीव्हीचे आढळून आले. पवनी शहरातील ४३९९ तर तुमसर शहरातील ११ हजार ३२३ रुग्णांची रक्त नमुना चाचणी घेण्यात आली. या दोन्ही शहरात पीव्ही किंवा पीएफचे एकही रुग्ण आढळून आले नाही. यासोबतच सानगडी, गोंडउमरी व दिघोरी या आदीवासी क्षेत्रातील रुग्णालयात २० हजार ३३८ नागरिकांचे रक्त नमुने घेण्यात आले. त्यात दोन पीव्हीचे रुग्ण तर चार पीएफचे रुग्ण असल्याचे रक्त नमुने तपासणीत सिद्ध झाले. जिल्ह्यात २०१० मध्ये चेंडीपुरा या आजाराची लागण झाली होती. यात ३१ रुग्णांना ही लागण झाल्याचे रक्त नमुना चाचणीतून स्पष्ट झाले होते. त्यानंतर या आजारावर आरोग्य विभागाने नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले आहे. (शहर प्रतिनिधी)चार वर्षात कीटकजन्य आजाराने १५ जणांचा मृत्यूमलेरिया विभागाने व्हॉयलर इंसेफलायटिस्ट या प्रकाराच्या आजाराने जडलेल्या रुग्णांची रक्त नमुना चाचणी घेतली. यात २०११ ते १४ या चार वर्षात १५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. २०११ मध्ये पाच रुग्णांना त्याची लागण झाली होती. त्यात तिघांचा मृत्यू झाला. १२ मध्ये २१ जणांना लागण तर ८ जणांचा मृत्यू. २०१३ मध्ये दोन जणांना लागण व दोघांचाही मृत्यू तर २०१४ मध्ये पाच जणांना लागण तर दोघांचा मृत्यू झाला. यावर्षी आजाराची गंभीर परिस्थिती नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.पावसाळ्याच्या दिवसात कीटकजन्य आजारासाठी पोषक वातावरण असते. पुढील दोन महिन्यात हिवतापाच्या किटकांसाठी हे वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून परिसरातील स्वच्छता ठेवावी.- डॉ.आर.डी. झलकेप्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी, भंडारा.
२ लाख ३० हजार नागरिकांचे घेतले रक्त नमुने
By admin | Published: September 23, 2015 12:47 AM