पवनी : येथील नगर परिषदेची पाणीपुरवठा योजना १९७५ मध्ये कार्यान्वित झाली. ४५ वर्षांच्या कालखंडात नगरात पाणीपुरवठा योजनेची मुख्य पाईपलाईन कित्येकदा फुटली. त्यामुळे नगरातील पाणीपुरवठा दोन-तीन किंवा चार दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी खंडित झालेला नव्हता. मात्र १९ ऑगस्ट व नंतर २६ ऑगस्टला फुटलेली पाईपलाईन पूर्ववत करून पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी पालिका प्रशासनाने तब्बल १३ दिवस लागले. सलग आठवडाभर पाणीपुरवठा बंद ठेवल्याचा पालिकेने इतिहास रचला आहे.
पाणीपुरवठ्यासारख्या लोकहिताच्या व गंभीर विषयाला हाताळताना नगरपालिका अध्यक्ष, उपाध्यक्ष, पाणीपुरवठा समिती सभापती व पाणीपुरवठा योजनेसाठी कार्यरत अभियंता या सर्वांनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्याचप्रमाणे गावातील सुरू असलेल्या बांधकामावर निगराणी ठेवण्यासाठी नियुक्त स्थापत्य अभियंता यांनी सुरू असलेल्या बांधकामावर प्रत्यक्ष भेटी न देणे हे कृत्यदेखील पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे. जवाहर गेटला पर्यायी गेट व गेटच्या दोन्ही बाजूंना सौंदर्यीकरणाचे काम जलदगतीने सुरू आहे. १९ व २६ ऑगस्टला सौंदर्यीकरणाच्या कामावर सुरू असलेल्या जेसीबीचा धक्का लागून जेथे पाईपलाईन फुटली तेथे पाईपलाईनला प्रेशर व्हाॅल्व्ह आहे. ते दिसत असताना चूक कशी झाली? पाणीपुरवठा व बांधकाम यासाठी कार्यरत असलेल्या अभियंत्यांनी काम सुरू असताना उपस्थित का राहू नये? त्यांनी उपस्थित राहू नये यासाठी त्यांचेवर कोणाचा दबाव होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे भविष्यात सत्ताधारी गटाला द्यावी लागणार आहेत. भारतीय पुरातत्त्व विभागाने संरक्षित न केलेली जवाहर गेटच्या उत्तरेस असलेली भिंत प्रत्येक वर्षी पावसाळ्यात खचत आहे. त्यामुळे ती भिंत पूर्णतः काढून पवनी नगराला वैनगंगा नदीपर्यंत राष्ट्रीय महामार्गाला जोडल्यास उद्योगधंद्यात वाढ होण्याची व जमिनीचे मूल्य वाढण्याची शक्यता आहे. असे न करता पालिका प्रशासनाने मातीच्या भिंतीवर सौंदर्यीकरणाचे काम सुरू केले आहे. नगरात असलेले शेकडो मंदिरे, नदीवरील घाट व मातीच्या भिंतीवर असलेले परकोट यांच्या सौंदर्यीकरण व दुरुस्ती यावर एवढा निधी खर्च केला असता तर पर्यटनाचे दृष्टीने पवनीचे महत्त्व अधिक वाढले असते, त्याचा फायदा गावातील व्यावसायिकांना मिळाला असता. पवनीतील राजकीय पुढाऱ्यांकडे इच्छाशक्तीचा अभाव असल्याने पवनीचा विकास खुंटला व व्यवसायातील गती मंदावली आहे.
010921\img_20210830_143715.jpg
ऐतिहासिक जवाहर गेट च्या उत्तर दिशेला मातीच्या भिंतीवर सुरु असलेले पर्यायी गेट व सौंदर्यीकरणाचे काम