चुल्हाड (सिहोरा) : मंडळ कृषी कार्यालयाचे स्थानांतरण हरदोली गावात झाल्याने शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या कार्यालयाचे स्थानांतरण सिहोरा स्थित असणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या वसाहतीत करण्याचे निर्देश आमदार चरण वाघमारे यांनी दिले. यामुळे शेतकऱ्यांची समस्या सुटणार आहे.सिहोरा येथील हक्काचे मंडळ कृषी कार्यालय ७ कि.मी. अंतरावरील हरदोली गावात स्थानांतरीत करण्यात आले आहे. शासकीय इमारतीचे कारण पुढे करून या कार्यालयाची पळवापळवी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांशी निगडीत संबंधित कार्यालय सिहोरा गावात असताना मंडळ कृषी कार्यालय गावात नसल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. या शिवाय कार्यालयात शेतकरी गेल्यास आल्यापावली परतण्याची वेळ त्यांच्यावर येत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. यामुळे नाकीनऊ आले आहे. दरम्यान मंडळ कृषी कार्यालयाची इमारत जिर्ण झाली आहे. पावसाळ्यात इमारतीचे छत गळत आहे. यामुळे प्रशासकीय कामे करताना कार्यरत कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. ७३ गावांचा प्रशासकीय कारभार करताना कर्मचाऱ्याची गोची होत आहे. पावसाळ्यात इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही. याशिवाय इमारतीत दोन खोल्या आहेत. या खोल्या टेंशन वाढविणाऱ्या आहेत. इमारत लहान असल्याने शेतकऱ्यांना बैठकीची व्यवस्था नाही. इमारतीत प्रशासकीय कारभार करताना कार्यरत कर्मचारी वैतागली आहेत. या संदर्भात कार्यालय स्थानांतरणाचे अनेक पत्रव्यवहार करण्यात आले आहे. परंतु तोडगा काढण्यात आलेला नाही. सिहोऱ्यात कार्यालय बांधकामाचा निर्णय अंतिम टप्प्यात असताना जागा आणि निधीचा गुंता सुटत नसल्याने कर्मचाऱ्यांवर वाढते संकट आहे. यंदा पावसाळ्यात या इमारतीतून प्रशासकीय कारभार करण्याची मानसिकता कार्यरत कर्मचाऱ्यांची नाही. यामुळे शेतकऱ्यांचे कामे प्रभावित करणार आहे. पाणलोट समितीचे कार्य या कार्यालयाला जोडण्यात आल्याने मनुष्य बळ संख्येत वाढ झाली आहे.परंतु कार्यालयात सुविधा नगण्य आहेत. यामुळे या कार्यालयाचे स्थानांतरण सिहोरा गावात करण्याची ओरड सुरु झाली आहे. दरम्यान गावात लघु पाटबंधारे विभागाचे कार्यालय शिवारात वसाहतीचे बांधकाम झाले असून यात कुणी वास्तव्य करीत नाही. या वसाहतीत सर्व सुविधा उपलब्ध आहेत. वसाहतीतय असणाऱ्या ३ खोल्या प्रशासकीय कामकाज तथा २ खोल्या गोडावून करिता मंडळ कृषी कार्यालयाला देण्याची अपेक्षा अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. दोन्ही विभाग राज्य शासनाच्या अखत्यारीत असल्याने यात आ.चरण वाघमारे यांना हस्तक्षेप करणारे निवेदन देण्यात आले आहे.मंडळ कृषी कार्यालयाचे स्थानांतरणानंतर शेतकऱ्यांना सोयीचे ठरणार आहे. यामुळे आ.चरण वाघमारे यांनी पाटबंधारे विभागाचे रिकाम्या असणाऱ्या वसाहतीची पाहणी केली आहे. या वसाहतीत असणाऱ्या खोल्या मंडळ कृषी कार्यालयला देण्यात कुठलीही अडचण नाही. असा संवाद कार्यकारी अभियंता चोपडे यांचे सोबत साधला असून या वसाहतीत मंडळ कृषी कार्यालयाचे स्थानांतरण होणार असल्याने कर्मचारी व शेतकऱ्यांत आनंद आहे. यावेळी आ.वाघमारे सोबत पं.स. सभापती कलाम शेख, राजेश पटले, गजानन निनावे, बालू तुरकर, मयूरध्वज गौतम, भास्कर सोनवाने, अशोक पटले, सुभाष बोरकर उपस्थित होते. (वार्ताहर)
सिहोऱ्यात मंडळ कृषी कार्यालयाचे स्थानांतरण होणार
By admin | Published: May 24, 2015 1:21 AM