कोविडच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण भारतात थैमान घातलेले आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात विस्फोटक परिस्थिती निर्माण झाली असून प्रत्येक जिल्ह्यातील गावागावात रुग्ण आढळत आहेत. विशेष म्हणजे या लाटेत मृतांचा आकडा फार झपाट्याने वाढत आहे. आपला भंडारा जिल्हादेखील याला अपवाद राहिलेला नाही. जिल्ह्याचा संक्रमितांचा आकडा दिवसेंदिवस फुगत चाललेला आहे. दवाखाने रुग्णांनी भरून गेले आहेत. व्यवस्था तोकडी पडत आहे. त्याचबरोबर रोजची मत्यूसंख्यासुद्धा वाढत आहे. रोज जिल्ह्यात २५ ते ३० रुग्ण कोरोनामुळे दगावत आहेत आणि जिल्ह्यातील सर्व कोरोनाग्रस्त रुग्णांवर जिल्हा प्रशासनाने भंडारा शहराजवळील गिरोला करचखेडा येथे स्मशानभूमी तयार केलेली आहे. दररोज एवढ्या मृृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना तेथील व्यवस्थेवर प्रचंड ताण पडत आहे.
मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी तासनतास ताटकळत ठेवावे लागत आहे. अंत्यसंस्कार नीट होत नसल्याच्या तक्रारीसुद्धा येत आहेत.
या सर्व परिस्थितीचा विचार करून साकोली नगरपालिका प्रशासनाच्या वतीने साकोलीचे तहसीलदार व नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी कुंभारे व नगरसेवक रवी परशुरामकर यांनी पुढाकार घेऊन साकोली तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर साकोलीतीलच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करता यावेत, यासाठी साकोलीजवळून वाहणाऱ्या जुमरी नाल्याजवळील स्मशानभूमीची तत्काळ व्यवस्था करून ती स्मशानभूमी तयार केली आहे. तालुक्यातील गावागावातील रुग्णांचे मृृतदेह रुग्णवाहिकेत घालून भंडारा येथे अंत्यसंस्कारासाठी न्यावे लागत व तिथेही मृतदेह व नातेवाईकांना ताटकळत बसावे लागत होते. ही परिस्थिती सुधारण्यासाठी व मृृतदेहांची विटंबना टाळण्यासाठी साकोली नगरपालिका प्रशासनाने जनतेच्या सोयीसाठी ही व्यवस्था केली आहे. त्याची सुरुवात झाली असून शनिवार रोजी तालुक्यातील एका कोविड रुग्णाच्या मृतदेहावर या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारदेखील करण्यात आले आहेत.