देवानंद नंदेश्वर, भंडारा : वैनगंगा नदीपात्रात डोंग्याच्या सहाय्याने मासेमारी करीत असताना अचानक मिरगी आल्याने नदीत बुडालेल्या एका २८ वर्षीय युवकाचा मृतदेह दोन दिवसानंतर सोमवारी सकाळी ११ वाजता आढळून आला. नितेश गोमा मारबते (२८, करचखेडा जुना, ता. भंडारा), असे मृत युवकाचे नाव आहे.
नितेश मारबते हा शनिवारी मासे पकडण्यासाठी डोंग्याने वैनगंगा नदीपात्रात गेला. मात्र सायंकाळी ४:३० वाजताच्या सुमारास त्याला मिरगी आल्याने तो डोंग्यातून नदीच्या पाण्यात पडुन बुडाला. त्याचा शोधाशोध केली असता तो आढळून आला नाही. अखेर सोमवारी ११:३० वाजता दरम्यान त्याचा मृतदेह सालेबर्डी नदी परीसरात वैनगंगा नदीचे काठावर पाण्यात मिळून आला. मुकेश गोमा मारबते यांच्या तक्रारीवरुन कारधा पोलिसांनी मर्ग नोंदविला आहे. तपास पोलिस नायक विकास जाधव करीत आहेत.