चुल्हाड (सिहोरा) : चांदपूर जलाशयाच्या मुख्य कालव्यात रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सिहोरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला. प्रकाश कटरे (वय ५०, रा. चिचोली, बघेडा ) असे मृताचे नाव आहे.
प्रकाश कटरे हे आठ दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार तुमसर पोलीस ठाण्यात नातेवाइकांनी दिली होती. शोधाशोध सुरू असताना रविवारी सकाळी १० वाजता चांदपूर येथील लोकांना मुख्य कालव्यात मृतदेह आढळला. सिहोरा पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार नारायण तुरकुंडे हे ताफ्यासह घटना स्थळ गाठून ढिवरबांधवांना पाचारण करून मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह अक्षरशः कुजलेल्या अवस्थेत होता. मृतदेहाची तपासणी केली असता त्याच्याकडून एक मोबाईल, काही पैसे, तर जवळील एका इलेक्ट्रिक दुकानाच्या बिलावरील नावावरून ओळख पटण्यात मदत झाली.
दोन वर्षांपूर्वी मृतकाच्या पत्नीने त्रासाला कटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. प्रकाशेने दिवाळीमध्ये आठ लाखांमध्ये शेत जमीन विकली होती. मित्रमंडळींसोबत रोजच ओल्या पार्ट्या करायच्या अशी माहिती प्राप्त आहे. शेतजमीन विकणे, घरी पत्नी यांनी आत्महत्या करणे, मृतकाला मूलबाळ नसणे या मानसिक विवचंनेत होता. मात्र, तो चांदपूरला कशाने आला? त्यांच्यासोबत कुणी मित्र होते काय? त्यांनी आत्महत्या केली की कुणी घातपात तर केला नाही ना? अशा चर्चेला सध्या उधाण आले आहे. मात्र, या साऱ्या प्रश्नाचे उत्तर पोलीस चौकशीअंती कळणार आहे. यावेळी घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद बिसेन यांनी भेट दिली. सध्या पो. स्टे. सिहोरा येथे याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास ठाणेदार नारायण तुरकुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस नायक मनोज इळपाचे करीत आहे.