२० लोक ०४ के
लाखांदूर : बोगस चालानद्वारे गत अनेक महिन्यांपासून रेशन दुकानदारांच्या कमिशनसह ऑनलाइन कमिशन हडपण्याच्या घोटाळ्यातील बोगस चालान आढळले आहे. हे बोगस चालान तालुक्यातील एका रेशन दुकानदाराकडे आढळले आहे. या घोटाळ्यातील दोषींची नावे लवकरच उघड केली जाणार आहेत.
लाखांदूर तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभाग अंतर्गत कार्यरत एका अनधिकृत संगणक परिचालकाने गत अनेक महिन्यांपासून बोगस चालानद्वारे तालुक्यातील रेशन दुकानदारांचे कमिशन हडपल्याचे प्रकरण उजेडात आले होते. या प्रकरणी ‘लोकमत’ने वृत्तमालिका प्रसिद्ध करताच येथील अनधिकृत परिचालकाची हकालपट्टीदेखील करण्यात आली.
या घोटाळ्याच्या चौकशी संबंधाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चौकशीदेखील सुरू झाल्याचे बोलले जात आहे. मात्र सदर चौकशीदरम्यान तालुका प्रशासनाकडे शासनाला भरणा केलेल्या मूळ ऑनलाइन चालान उपलब्ध असताना बोगस चालान उपलब्ध नसल्याने या सबंध प्रकरणात घोटाळा झालाच नाही, अशी दिशाभूल जिल्हा प्रशासनाची केली जाण्याचा संशय घेण्यात आला.
त्यानुसार प्रस्तुत प्रतिनिधीने बोगस चालान उपलब्ध होण्यासाठी तालुक्यातील काही रेशन दुकानदारांना संपर्क केला असता एका रेशन दुकानदाराने सदर बोगस चालान उपलब्ध करून दिले आहे. या बोगस चालाननुसार येथील अन्न पुरवठा विभागांतर्गत दरमहा रेशन दुकानदारांच्या कमिशनमधून अतिरिक्त ५०० ते १००० रुपयेपर्यंत कपात करण्यात येऊन दरमहा लाखो रुपयांची लुबाडणूक केल्याचे दिसून येत आहे.
तथापि, या सबंध घोटाळ्यातील दोषी अधिकारी व परिचालकाने बचावासाठी येथील तालुका प्रशासनासह जिल्हा प्रशासनाकडे मर्जी संपादनासाठी हालचाली चालविल्याच्या चर्चेलादेखील वेग आला आहे. मात्र तालुक्यातील एका रेशन दुकानदाराने गत अनेक महिन्यांतील बोगस चालानसह मूळ ऑनलाइन चालान उपलब्ध करून दिल्याने या कमिशन घोटाळ्यातील दोषींचा लवकरच पर्दाफाश केला जाण्याची शक्यता आहे.
कोट बॉक्स
अन्न पुरवठा विभागांतर्गत सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीत रेशन दुकानदार हा महत्त्वाचा घटक आहे. या दुकानदाराने धान्याची अफरातफर केल्यास संबंधिताविरोधात दुकान निलंबन, दंड तर कधी कधी फौजदारी कारवाई करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र येथील अन्न पुरवठा विभाग अंतर्गत खुद्द वितरण प्रणालीतील महत्त्वाच्या घटकाला लुबाडल्याची ओरड असल्याने दोषी विरोधात फौजदारी कारवाई करण्याची मागणी आहे.
- रामचंद्र राऊत, माजी गटनेते, नगरपंचायत लाखांदूर.