जांब(लोहारा) मोहाडी तालुक्यातील जांब, खैरलांजी, सकरलाव तुमसर तालुक्यातील लोहारा, येथील शेतकऱ्यांची एका बियाणे कंपनीने १४५ दिवसांचे वाण खरेदी केले. परंतु त्या वाणाला ९० ते १०० दिवसात ओंबी आली. यामुळे बोगस बियाणे देऊन फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीला आला आहे. या प्रकरणाची कृषी विभागाकडे तक्रार देण्यात आली आहे.
बोगस बियाणामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे . हेमराज लांजेवार जांब, देवचंद सार्वे सकरला, फुलचंद ढोरे लोहारा, दिवाकर नेवारे लाहारा, या शेतकऱ्यांनी जांब येथील कृषी केंद्रातून १ हजार ८ वाणाचे बियाणे खरेदी करून पेरणी केली होती. बियाणे बोगस निघाल्याने काही प्रमाणात उगवले नाही. बोगस बियाणे कंपनीकडून शेतकऱ्यांना देण्यात आले. बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांकडून कृषी विभागावर नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका तर बसत आहे. शिवाय बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची शेती पडीत राहत आहे. मात्र कृषी विभागाकडून बियाणे कंपनीवर कुठलीही कारवाई केली जात नाही. बोगस बियाणे देणाऱ्या कंपनीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून योग्य ते कारवाई करावी, अशी मागणी हेमराज लांजेवार जांब, देवचंद सार्वे सकरला, फुलचंद ढोरे लोहारा, दिवाकर नेवारे लोहारा यांनी केली आहेत. काही बियाणे उगवत नाही तर काही बियाणे खराब निघत असल्याने उत्पादनात घट येत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. दरवर्षी बोगस बियाणे कंपन्यांचा सुळसुळाट दिसून येते. तसेच सर्रास बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपनीवर कृषी विभागाकडून कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. कृषी विभागाच्या चुकीच्या व दुर्लक्षित धोरणामुळे शेतकरी त्रस्त होत असल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे.