लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य शासनाने गतवर्षी नागपूर हिवाळी अधिवेशनात धानाला प्रति हेक्टर २० हजार रुपये बोनस दोन हेक्टर मर्यादेत देण्याची घोषणा केली. पंधरा दिवसांपूर्वी शासन परिपत्रकही निघाले. पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बोनसची रक्कम लवकरच जमा केली जाईल असे सांगितले गेले. पण अद्यापही रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे बोनसची रक्कम बँक खात्यावर जमा केव्हा होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.
आधी आदेशासाठी, आता पैशांसाठी प्रतीक्षामहायुती सरकारने धानाला बोनसची घोषणा चार महिन्यांपूर्वी केली. पण त्यासंदर्भातील आदेश निघण्यासाठी चार महिने लागले. शेतकऱ्यांना आदेशासाठी प्रतीक्षा करावी लागली. आता आदेश निघाले; पण बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा न झाल्याने प्रतीक्षाच करावी लागत आहे.
नोंदणी न करणारे वंचितशासनाच्या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी केली होती. ते शेतकरी बोनससाठी पात्र ठरणार आहेत. तर ज्यांनी नोंदणी केली नाही, ते लाभापासून वंचित राहणार आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम जमा झालेली नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.
"३१ मार्चपूर्वी पीक कर्ज परतफेड करण्याची मुदत संपूनही पैसे जमा झालेले नाही. आता खरीप हंगामापूर्वी तरी बोनस मिळावे."- गौरीशंकर राऊत, शेतकरी पांजरा.