देवानंद नंदेश्वरलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शिक्षण विभागाने २०२२-२३ या नवसत्रासाठी यंदा १ ते ८ पर्यंत जिल्ह्यात ९७ हजार २७० विद्यार्थ्यांची नोंद केली आहे. २६ जून रोजी शाळेचा ठोका वाजणार असून त्या दृष्टीने शिक्षण विभागाने आपली तयारी सुरू केली आहे. यात सर्व शिक्षा विभागाकडून या विद्यार्थ्यांना पुस्तके दिली जात आहेत. त्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके देता यावीत, यासाठी ५ लाख १६ हजार ७०९ पुस्तकांची मागणी शिक्षण मंडळाकडे केली आहे.कोरोना नियंत्रणात आल्यामुळे शाळा-महाविद्यालये उघडली आहेत. सध्या उन्हाळी सुट्ट्या लागल्या असून, येत्या २६ जून रोजी शाळेचा ठोका वाजणार आहे. त्या दृष्टीने शिक्षण विभागाने आपली तयारी सुरू केली आहे. इयत्ता १ ते ८ पर्यंत ९७ हजार २७० विद्यार्थ्यांची नोंद केली आहे. शिक्षणाच्या अधिकारानुसार एकही मूल शिक्षणापासून सुटू नये या दृष्टीने शिक्षण विभाग कार्य करतो.
कोणाला मिळणार मोफत पुस्तके आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, आदिवासी व जिल्हा परिषदेच्या शाळांत शिकणाऱ्या गरीब, गरजू मुला-मुलींना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात. अनुसूचित जातीतील सर्व मुले-मुली, अनुसूचित जमातीतील सर्व मुले-मुली यांना मोफत पुस्तके देण्यात येतात.
तीन तालुक्यांना मिळाली
- भंडारा, लाखनी व साकोली या तीन तालुक्यांना पुस्तके मिळाली आहेत. भंडाराला एक लाख एक हजार ३८५ पुस्तके मिळाली असून, ५ हजार २२५ पुस्तके मिळणे बाकी आहे. लाखनीला ६० हजार २०० पुस्तके मिळाली असून ३ हजार ५० पुस्तके बाकी आहेत. साकोलीला ६३ हजार ४६७ पुस्तके मिळाली असून ३ हजार ३२१ पुस्तके बाकी आहेत.
९७ हजार विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश- भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील विद्यार्थ्यांना गणवेश दिला जाणार आहे. त्यात भंडारा १९१३७, लाखांदूर ११९८४, लाखनी ११३१२, मोहाडी १२६७०, पवनी १३३३३, साकोली १२०७५ व तुमसर १६७५९ विद्यार्थ्यांना गणवेश दिला जाणार आहे.
दोन वर्षे कोरोनाचा अडसर- कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दोन वर्षांपासून पुस्तके देण्यात आली नाहीत. एकच जोडी गणवेश पुरविण्यात आला. शिक्षण सत्र २०२२-२३ करिता जिल्ह्यात १ लाख ४९ हजार ५५० विद्यार्थ्यांना ५ लाख ७३ हजार ७१७ पुस्तके दिली जाणार आहेत.- सर्वाधिक ४१ हजार ४६३ विद्यार्थ्यांची नोंद गोंदिया तालुक्यात करण्यात आली असून, त्यांच्यासाठी १ लाख ४४ हजार १५२ पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे.