धान खरेदी केंद्र अडचणीत : शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली, १०१० ला ‘अ’ दर्जा द्यामुखरू बागडे पालांदूरजिल्ह्यात २४ आॅक्टोबरपासून धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आली. ज्यात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यांनी बेधडक खरेदी सुरु केली. मात्र काही खरेदी केंद्राना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. अशावेळी त्या केंद्राअंतर्गत गावांना धान विकता येत नाही. सातबारा शिवाय खरेदी होत नाही. शिवाय संगणीकृत खरेदीमुळे पारदर्शकता शक्य आहे. दरम्यान खरेदी केंद्रांना घातलेले गाव सीमेचे बंधन शेतकऱ्यांसाठी मारक ठरले आहे.पालांदूरला सेवा सहकारी संख्येचे हमी धान खरेदी मिळाले आहे. मात्र कोठाराअभावी धान खरेदी सुरुच झालेली नाही. मात्र शेजारील गावात हमी केंद्र सुरु झालेली आहेत. त्या ठिकाणी बेधडक खरेदी सुरु आहे. अशावेळी पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांनी स्वत:चा सातबारा सोबत नेत धान विकला तर खरेदीला जिल्ह्यात कुठेही अडचण नसावी. भंडारा जिल्ह्यात जमिनीचा पोत व पाण्याची सुविधा पाहून धान पिकाची निवड केली जाते. ठोकळ धान व बारीक धान अशी दोन दर्जाची वाण जिल्ह्यात घेतली जातात. लाखनी तालुक्याच्या परिसरात ठोकळ धानाचे वाण अत्यल्प प्रमामात घेतले जाते. फाईन अर्थात बारीक धान कमी भावामुळे खरेदी केंद्रावर विकली जात नाही. अशावेळी त्या भागातील खरेदी केंद्रे रिकामीच असतात. ठोकळ धानाचा शेतकरी हमी केंद्राच्या सीमा वादात अडकण्यापेक्षा सातबाराच्या मर्यादेनुसार खरेदी व्हावी.व्यापाऱ्यांना नजरेसमोर ठेवून सीमा वादाचा मुद्दा पुढे येत असेल तर व्यापारी ही चतुर झाले आहेत. व्यापाऱ्यांनी मधूरसंबंधाने सातबारे (जमा) जमवूनच खरेदी सुरु केली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळूच शकत नाही, अशी परिस्थिती सध्या आहे. पालांदुरात कोठार व्यवस्था तोकडी असल्याने सेवा सहकारी संस्थेने धान खरेदी सुरु केली नाही. अपुऱ्या व्यवस्थेतून धान खरेदीला मार्ग निघू शकतो. परंतु शेतकऱ्यांविषयी जिव्हाळा नसल्याने दररोजच संकटे वाढत आहेत. संस्थेच्या गोडावूनमध्ये खरेदी करून हप्ताभराच्या अंतराने मालाची उचल केल्या गेली तर पालांदुरला आजच खरेदी शक्य आहे.शासनाने पर्यायाने प्रशासनाने धान खरेदीत अ व ब अशी प्रतवारी केली आहे. अ दर्जाच्या धानाला अधिक भाव जाहीर केला. पालांदूर धान खरेदी केंद्रावर ठोकळ व लांब धान पूर्णत: सुकलेला असताना देखील त्याचा अ दर्जा मिळत नाही. २०२०, आय आ ६४, सारखे वाण अ दर्जात मोडतात. पण जिल्हा प्रशासनाला मान्य नाही. या विषयात तात्वीक चर्चा शेतकऱ्यांशी होणे काळाची गरज आहे. तीन वर्षापूर्वी जिल्ह्यात १०१० सारखी ठोकळ वाण अ दर्जात खरेदी केली होती. मग आता का नाही? असा प्रश्न पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांना पडला आहे. धान खरेदी पारदर्शक व सुटसुटीत होण्याकरिता लोकप्रतिनिधी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनशी सलगी करून यथोचित मार्गाची सक्त गरज आहे. खरेदी झालेला माल त्वरीत उचल करीत शेतकऱ्यांना नगदी चुकाऱ्याची सोय आवश्यक आहे. दिवाळी सारख्या सणाला शेतकऱ्यांना उधारीवर जगावे लागते हे कृषीप्रधान देशाचे दुर्भाग्य आहे. दिवाळीच्या सणात शेतकऱ्यांची काय स्थिती आहे हे ग्रामीण भागात आल्यावर २१ व्या शतकातला भारत देश डोळ्यासमोर येईल. तेव्हा धान उत्पादक शेतकऱ्यांकरिता ठोस निर्णयाची म्हणजे डॉ. स्वामीनाथन समितीची शिफारस आवश्यक आहे.
सीमाबंध शेतकऱ्यांसाठी मारक
By admin | Published: November 01, 2016 12:39 AM