भंडारा : कान्हळगाव वैनगंगा नदीत आपल्या मित्रांसोबत आंघोळीसाठी उतरलेल्या कोका येथील एका तरुणाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव येथे सकाळी १० वाजताच्या सुमास घडली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली.
हार्दिक भोजराम हातझाडे (१७) रा. कोका, असे मृताचे नाव आहे. तर, विक्की दिनेश साठवणे (१६) रा. खडकी व गणेश सहसराम बाह्मणे (१६) रा. बोरगाव असे बचावलेल्या तरुणांची नावे आहे. त्यांना सहादेव रामकृष्ण शेंडे (२६) रा. कान्हळगाव यांनी वाचविले.
खडकी येथे शनिवारी मंडई उत्सव असल्याने हार्दिक हातझाडे हा बोरगाव येथील एका मित्रासोबत खडकी येथे मित्रांकडे आला होता. मंडई उत्सवात विविध तिघांनी कार्यक्रमांचा आनंद घेतला. रविवारी सकाळी तिघांनी वैनगंगा नदीत पोहण्याचा आनंद लुटण्याचा बेत आखला.
त्यानुसार सकाळी तिघेही मित्र कान्हळगाव येथील वैनगंगा नदीघाटावर आले. पोहत असताना हार्दिक खोल पाण्यात गेला. परंतु त्याला पोहता येत नव्हते. तर अन्य दोघांना पोहता येत होते. परंतु दोघेही मित्रास वाचविण्यासाठी सरसावले. त्यावेळी बुडणाऱ्या हार्दिकने आपल्याकडे ओढल्याने तेही बुडत होते. हा प्रकार नदीवर जनावरे धूत असलेल्या सहादेव रामकृष्ण शेंडे यांच्या लक्षात आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेऊन दोघांना वाचविले. मात्र तोपर्यंत हार्दिक खोल पाण्यात दिसेनासा झाला होता.
गावकऱ्यांची नदी तीरावर गर्दी
घटनेची माहिती होताच ग्रामस्थांनी नदीच्या दिशेने धाव घेतली. सरपंच दिगांबर कुकडे व संजय भोयर यांनी घटनेची माहिती करडी पोलिसांना दिली. ठाणेदार नीलेश वाजे, करडी बिट अंमलदार शहारे, देव्हाडाचे बिट अंमलदार लंकेश राघोर्ते व पोलीस दलाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल झाले. तातडीने मृतदेह शोध कार्य सुरू करण्यात आले. अखेर दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान दहा फूट पाण्यात हार्दिकचा मृतदेह नावाड्यांना मिळाला. शोध कार्यासाठी नाबाडी संजय केवट, मनीष कांबळे, क्रिश शेंडे, रोहन मेंढरे, अक्षय केवट यांनी सहकार्य केले.