मोहन भोयर
भंडारा : तुमसर तालुक्यातील जगप्रसिद्ध ब्रिटिशकालीन मँगनीज खाणीच्या विस्तारीकरणाला जंगल व्याप्त परिसर आणि शेजारी असलेल्या गावांचा मोठा फटका बसत आहे. गत ११९ वर्षांत एकादाही खाण क्षेत्र वाढविण्यात आले नाही. खाणींचे विस्तारीकरण झाल्यास येथे रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होऊ शकते.
देशात डोंगरी बु. येथील खुली आणि तिरोडी येथील भूमिगत खाण देशात अव्वल आहे. मँगनीज हा धातू बहुपयोगी असून औषधी, फर्टीलायझर, लोखंड तयार करण्यासाठी उपयोगात येतो. सध्या देशात सर्वात जास्त मँगनीज गुजरात राज्यात जात आहे. सर्वे ऑफ इंडियाने येथे सर्वेक्षण करून भूगर्भात मँगनीजचा मोठा साठा असल्याचा अहवाल दिला होता. याशिवाय तुमसर तालुक्यातील कारली, गारकाभोंगा, आसलपाणी, झंझेरीया, रोंघा, येदरबुची, घानोड, सक्करदरा, हिवरा(मोहाडी) या परिसरात मँगनीजचा साठा भूगर्भात आहे.
१९८० मध्ये राखीव वन कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे खाण क्षेत्र विस्तारीकरणाला अडचण निर्माण झाली. खाण क्षेत्र विस्तारीकरणाला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनसुनावणी घेण्यात येते. खाण क्षेत्र गावाजवळ येऊ नये व गावाला त्याचा फटका बसू नये यासाठी स्थानिक गावकऱ्यांच्या विरोध आहे. सुंदरटोला गावाजवळ चारशे एकर जागा आहे. परंतु विस्तारीकरणाला हिरवा झेंडा न मिळाल्याने प्रस्ताव रखडला आहे.
आरोग्य व मूलभूत सोयीसुविधांचा अभाव
जगप्रसिद्ध खाण परिसरातील गावात अजूनही आरोग्य व मूलभूत सुविधांचा अभाव आहे. नियमाप्रमाणे खाण प्रशासनाने खाण परिसरातील गावात आरोग्य व मूलभूत सोयी सुविधा पुरविण्याचा नियम आहे. परंतु त्याचा येथे अभाव दिसून येतो. त्यामुळे नगरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.
खाणीकडे जाणारे रस्ते खड्डेमय
चिखला व डोंगरी खाणीकडे जाणारा मुख्य रस्ता खड्डेमय झाला आहे. खाण परिसरातील गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांचीसुद्धा दुर्दशा झाली आहे. ओव्हरलोड ट्रक रात्रंदिवस धावत असतात. त्यामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे.
शुद्ध पाण्याचा अभाव
खाण परिसरातील गावात पाण्याची सुविधा आहे. अनेक गावात विहिरीवरून पाणीपुरवठा होतो. गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून काही गावांना पाणीपुरवठा केला जातो. ही योजना बावनथडी धरणावर आहे. मात्र, मुबलक पाणीपुरवठा होत नाही. नाईलाजाने नागरिकांना विहिरीचे पाणी प्यावे लागते. खाण परिसरातील गावात विहिरींचे पाणी क्षारयुक्त आहे. त्यामुळे नागरिकांचे आजार बळावले आहेत.