तुमसर: गाव तिथे एसटी, या वाक्याला सध्या हरताळ फासला जात आहे. तुमसर तालुक्यातील जगप्रसिद्ध मॅग्निज खाण असलेल्या चिखला येथे एसटीची सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळे नागरिकांत प्रचंड असंतोष आहे. सदर बस गाडी पूर्ववत सुरू करण्याची मागणी चिखल्याचे माजी सरपंच दिलीप सोनवणे यांनी केली आहे.
लोकसंख्येच्या दृष्टीने चिखला व सीतासावांगी ही दोन मोठी गावे आहेत. या दोन्ही गावात जगप्रसिद्ध मॅग्निज खाणी आहेत. त्यामुळे येथे कामगारांची व कर्मचाऱ्यांची मोठी संख्या आहे; परंतु चिखला येथे तुमसरवरून एसटी बस सध्या जात नाही, त्यामुळे येथील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांची ही मोठी गैरसोय होत आहे. एकेकाळी दिवसातून तीन वेळा बस गाडी येथे जात होती. पूर्वी चिखला व कवलेवाडा येथे रात्री बस थांबा होता. चिखला व सीतासावंगी येथून थेट नागपूरला जाण्याकरिता बस गाडी होती; परंतु ते सर्व आता भूतकाळात जमा झाले आहे. तुमसर कवलेवाडा मार्गे सीतासावांगी, चिखला हमेशा या मार्गावर सकाळी नऊ, दुपारी दोन व संध्याकाळी पाच वाजता बस सेवा सुरू करण्याची मागणी चिखलाचे माजी सरपंच दिलीप सोनवणे यांनी आगारप्रमुख यांना केली आहे.