तुमसर : तालुक्यातील चिखला व डोंगरी येथील जगप्रसिद्ध ब्रिटिशकालीन मँगनीज खाणीच्या विस्तारीकरणाला ब्रेक लागला असून, गत ११९ वर्षांत या खाणींचे क्षेत्र वाढविण्यात आले नाही. जंगलव्याप्त परिसर आणि खाणीशेजारी गावे असल्याचा फटका विस्तारीकरणाला बसला आहे. या खाणींचे विस्तारीकरण झाल्यास येथे रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगा चिखला व डोंगरी बुज. येथे ब्रिटिशांनी १९०२ मध्ये मँगनीज खाणी सुरू केल्या होत्या. हा परिसर पूर्वी सीपी अँड बेरार या प्रांतात येत होता. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सर्वे ऑफ इंडियाने येथे सर्वेक्षण करून भूगर्भात मँगनीजचा मोठा साठा असल्याचा अहवाल दिला होता. याशिवाय तुमसर तालुक्यातील कारली, गारकाभोंगा, आसलपाणी, लंजेरा, रोंघा, येदरबुची, घानोड, सक्करदरा, झंझरिया, पिटेसूर, हिवरा (मोहाडी) या परिसरात मोठ्या प्रमाणात मँगनीज भूगर्भात आहे. १९८० मध्ये राखीव वन कायदा लागू करण्यात आला, त्यामुळे खाण क्षेत्र विस्तारीकरणाला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे मायनिंग लीज वाढवून मिळाली नाही.
खाण क्षेत्र विस्तारीकरण करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनसुनावणी घेण्यात येते. खाण क्षेत्र गावाजवळ येऊ नये व गावाला त्याचा फटका बसू नये यासाठी गावकऱ्यांचा विरोध होतो. यामुळे खाण विस्तारीकरणाला गती येत नाही. सुंदरटोला गावाजवळ चारशे एकर जागा आहे; परंतु विस्तारीकरणाला हिरवी झेंडी न मिळाल्यामुळे तो प्रस्ताव तसाच पडून आहे.
बॉक्स
डोंगरीची खुली खाण देशात प्रथम क्रमांकावर
संपूर्ण भारतात डोंगरी बु. येथील खुली मँगनीज खाण ही प्रथम क्रमांकावर आहे. तिरोडी भूमिगत खान देशात अव्वल क्रमांकावर आहे. ब्रिटिशांनी येथे १९४० मध्ये मॉयल ऑफिस तयार केले होते. या खाणीतून संपूर्ण भारतात मँगनीज नामवंत कारखान्यात जाते. मँगनीज हा धातू बहुपयोगी असून, याच्या औषधी, फर्टिलायझर, लोखंड तयार करण्याकरिता उपयोगात येतो. सध्या देशात सर्वांत जास्त मँगनीज गुजरात या राज्यात जात आहे. तुमसर तालुक्यातील खाण परिसरात केवळ २० ते २५ मँगनीज प्रोसेसिंग प्लांट आहेत. त्यातही कमी मजूर असून, त्यांनाही शासनाकडून कोणतीच मदत मिळत नाही.
कोट
तुमसर तालुक्यात खाण क्षेत्र विस्तारीकरणाला गती मिळण्याची गरज असून, राखीव वन कायद्यात सूट मिळण्याची गरज आहे. स्थानिक स्तरावर बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी मँगनीजवर आधारित येथे उद्योग स्थापन करण्याची गरज आहे. आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याकरिता स्थानिक बेरोजगारांना त्यामुळे रोजगार मिळेल.
- प्रा. कमलाकर निखाडे, महासचिव जिल्हा काँग्रेस कमिटी