महावितरणविरूध्द नागरिकांचा आक्रोश : नागरिकांनी काढली उकाड्यात रात्र भंडारा : वीज वितरण कंपनीने पावसाळापूर्व तयारी केली असल्याचे सांगत असले तरी रविवारला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास धारगाव फिडर अंतर्गत येणाऱ्या गडेगाव उपकेंद्रातून वीजपुरवठा करणाऱ्या तीन ठिकाणी अचानक ‘ब्रेकडाऊन’ झाला. त्यामुळे नऊ गावातील नागरिकांना रात्र उकाड्यात काढावी लागली़ ‘ब्रेकडाऊन’चा नागरिकांनी वीज वितरण कंपनीविरूध्द संताप व्यक्त केला़ राज्य शासनाने राज्य भारनियमन मुक्त झाल्याची घोषणा केली असली तरी भंडारा जिल्ह्यात कोणत्याही कारणावरुन वीज पुरवठा खंडीत करणे नित्याचेच झाले आहे. परिणामी उकाड्यासोबत वीज पुरवठा खंडीतची झळ नागरिकांच्या मानगुटीवर बसली आहे. राज्य शासनाच्या भारनियमन मुक्तीचा फज्जा उडाला आहे. काल, रविवार रोजी सायंकाळी धारगाव परीसरात रिमझिम पावसाने हजेरी लावली. अचानक ३३ के. व्ही. गडेगाव उपकेंद्रातंर्गत येणाऱ्या तीन ठिकाणी 'ब्रेकडाऊन' झाल्याने नऊ गावातील वीजपुरवठा खंडीत झाला. परीणामी गडेगाव उपकेंद्रातंर्गत असलेल्या खुटसावरी, माडगी, टेकेपार, पिंपळगाव, डोडमाझरी, टेकेपार, राजेगाव (एमआयडीसी), डव्वा, गराडा या नऊ गावांचा वीज पुरवठा बंद झाला होता़ सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडीत झाला़ वीज अधिकाऱ्यांनी ‘ब्रेकडाऊन’ झालेल्या तीन ठिकाणी रात्रभर नादुरुस्त केबलची शोधाशोध केली. तोपर्यत सकाळ झाली होती. अखेर १६ तासानंतर वीज पुरवठा पुर्ववत सुरू करण्यात आला. नऊ गावातील हजारो नागरिकांना रात्र उकाड्यात काढावी लागली. वीज पुरवठा बंद झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला़ वीज पुरवठा खंडीत झाल्याने पाणी पुरवठा ठप्प झाला होता. वीज पुरवठा बंद असल्याने अनेक नागरीकांनी गडेगाव उपकेंद्र, लाईनमॅन, धारगाव येथील वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता रात्रीदरम्यान कुणीच प्रतिसाद दिला नाही. तास, दोन तासांनी वीजपुरवठा सुरु होईल, अशी शक्यता नागरीक वर्तवित होते. तो कालावधी निघून गेल्यावरही वीज पुरवठा सुरू झाला नाही. त्यामुळे महावितरणविरूद्ध नागरीकांचा राग अनावर झाला. खंडीत वीजपुरवठ्यामुळे १६ तास उकाड्याचा सामना करावा लागला. रात्रीला अंधार असल्याने चोरीच्या घटना, सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरीकांच्या सेवेसाठी तत्पर असल्याचे उर्जामंत्री सांगत असले तरी त्यांच्या अधिनस्थ अधिकारी, कर्मचारी नागरीकांच्या समस्या सोडविण्याकडे कानाडोळा करीत असल्याचे रविवारी रात्रीच्या प्रकारावरून स्पष्ट झाले. (नगर प्रतिनिधी)शहरातही लंपडावभंडारा शहरात सोमवारला दुपारी चार वाजतापासून विजेचा लंपडाव सुरू होता. सायंकाळी पाच वाजतापासून रात्री नऊ वाजतापर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता. त्याचा परिणाम कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह घरात काम करणाऱ्या महिलांना सोसावा लागला. लहान मुले असणाऱ्या घरात विजेअभावी महिलांची तारांबळ उडाली.धारगाव फिडर अंतर्गत डव्वा, पलाडीनजीक डोडमाझरी व खुटसावरीसमोरील शिवार, अशा तीन ठिकाणी रात्री ८.३० वाजता ब्रेकडाऊन' झाला. रात्रभर दुरुस्तीची कामे करण्यात आली. अखेर सकाळी केबलची दुरूस्त करण्यात आल्यानंतर वीज पुरवठा सुरू करण्यात आला़ - यु.बी.कांबळे, कनिष्ठ अभियंता, महावितरण कंपनी, धारगाव
‘ब्रेकडाऊन’ नऊ गावे अंधारात
By admin | Published: June 28, 2016 12:28 AM