भंडारा जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, लाखांदूर, साकोली आणि पवनी तहसील कार्यालयात काढण्यात आली. सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत असली तरी नागरिकांची गर्दी सकाळी १० वाजतापासूनच तहसील कार्यालयाच्या परिसरात दिसत होती. सर्वाधिक उत्सुकता होती ती १५ जानेवारी रोजी झालेल्या १४८ ग्रामपंचायतीमधील नागरिकांना. निवडणूक झाल्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने इच्छुकांमध्ये उत्सुकता दिसत होती. तहसील कार्यालयात एका एका ग्रामपंचायतीचे आरक्षण घोषित होत होते तसतसी उत्सुकता शिगेला पाेहाेचत होती. अपेक्षित आरक्षण निघालेले गट उत्साहात जल्लोष करीत होते तर अपेक्षित आरक्षण न निघालेल्या गटाचा हिरमोड झाल्याचे दिसून येत होते.
जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या बहुतांश गट ग्रामपंचायती आहेत. सात ते नऊ सदस्य निवडून आले आहे. सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी आहे हे माहीत नसताना निवडणूक लढविली गेली. शुक्रवारी आरक्षणाची सोडत निघाली. तेव्हा अनेक ठिकाणी बहुमत एका गटाला आणि आरक्षणामुळे सरपंचपद दुसऱ्या गटाला अशी अवस्था झाली होती. काही ग्रामपंचायतीमध्ये तर सरपंचासाठी आरक्षित प्रवर्गातून एकच उमेदवार निवडून आल्याने त्यालाच सरपंच करण्याशिवाय पर्याय नाही.
बॉक्स
मेहनतीवर पाणी फिरले
ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येकाने प्रचंड मेहनत घेतली. सरपंचपद आपल्याच गटाला मिळेल, अशी आशा बाळगून निवडणुकीचे नियोजन केले. वारेमाप खर्चही करण्यात आला. मात्र शुक्रवारी घोषित आरक्षणाने अनेकांच्या मेहनतीवर पाणी फेरल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी तुमसर तालुक्यातील ९७, मोहाडी ७५, भंडारा ९४, पवनी ८९, साकोली ६२, लाखनी ७१ आणि लाखांदूर तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली.
बॉक्स
आता लक्ष उपसरपंच पदावर
आरक्षण सोडतीने सरपंच पदाच्या अपेक्षेवर पाणी फेरले. मात्र स्वस्त बसतील ते गावपुढारी कसले. आता सरपंचपद नाही तर उपसरपंचपद तरी आपल्या गटाला मिळावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात सरपंच आणि उपसरपंचांची निवडणूक पार पडणार आहे. आरक्षण सोडतीनंतर अनेक ठिकाणचा घोडेबाजारही थंड बस्त्यात दिसत आहे.