राजेंद्र वामनराव शिंदे, रा. केळकरवाडी, जि. वर्धा असे हुंड्यासाठी रुसलेल्या नवरदेवाचे नाव आहे. लाखनी येथील हरिदास तानबाजी गायधने यांच्या मुलीचा विवाह राजेंद्र शिंदे याच्या सोबत ठरला होता. लग्नाची तयारी सुरू झाली. १५ ऑगस्ट रोजी साक्षगंधाचा कार्यक्रमही झाला. १६ सप्टेंबर रोजी लग्नाचा मुहूर्त ठरला. बैठकीत ठरल्याप्रमाणे कपडे घेण्यासाठी नियोजित वरास वधूपित्याने पैसेही दिले. त्यानंतर लग्नपत्रिका छापण्यात आल्या. लग्नासाठी लाखनी येथे हॉल बुक करण्यात आला. लग्नासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची खरेदी करण्यात आली. लाखनी येथे लग्नाची सर्व तयारी झाली असताना ऐन वेळेवर वर पक्षाकडून निरोप आला. दोन तोळ्याचा सोन्याचा गोफा आणि वऱ्हाड्यांना लाखनी येथे आणण्यासाठी दोन ट्रॅव्हल्सचा खर्च देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, वेळेवर कसे शक्य आहे, आम्ही ठरल्याप्रमाणे सर्व काही दिले, असे म्हणत वर पक्षाची मागणी वधूपित्याने नाकारली. वेगवेगळ्या पद्धतीने समजूत घातली; पण लग्नाच्या दिवशी नवरदेव वऱ्हाड घेऊन आलाच नाही. अखेर वधूपित्याने लाखनी पोलीस ठाणे गाठले. नियोजित नवरदेवाविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी राजेंद्र शिंदे याच्या विरोधात हुंडा प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गौरी उइके करीत आहेत.
हुंड्यासाठी रुसलेला नवरदेव मंडपात पोहोचलाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 4:39 AM