दीपक सावंत : महाआरोग्य मेळावा, दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटपभंडारा : आरोग्य आपल्या दारी ही शासनाची भूमिका असून आरोग्य विभागाने आरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून प्रत्येक रुग्णांपर्यंत आरोग्य सेवा पोहचवावी, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या वतीने आयोजित महाआरोग्य मेळावा व रक्तदान शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अॅड. रामचंद्र अवसरे हे होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. संजय जयस्वाल, सहाय्यक जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवीशेखर धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके आदी उपस्थित होते.प्रत्येक नागरिकांनी व्यक्तीगत स्वच्छता राखल्यास आजाराची संख्या निश्चित कमी होईल, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, हात स्वच्छ धुतल्यास निम्मे आजार कमी होण्यास मदत होईल. महाआरोग्य मेळाव्यात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांचा इलाज तर केला जाईलच सोबतच तो आजार मुक्त होईपर्यंत पाठपूरावा सुध्दा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. महिला रुग्णालयाच्या संदर्भात पालकमंत्री म्हणाले, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समितीकडे हा विषय आहे. राज्यात जिल्हा परिषदांची आचार संहिता असल्यामुळे हा विषय सद्या प्रलंबित असला तरी पुढील एका महिन्यात महिला रुग्णालयाचा प्रश्न निकाली निघेल.आमदार अवसरे म्हणाले, नेत्रदान, अवयवदान व रक्तदान हे तीन दान श्रेष्ठ आहेत. मात्र आरोग्य शिबीराला गर्दी होणे ही बाब आरोग्याच्या दृष्टीने खुप चांगली नाही. पवनी येथे उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, महाआरोग्य मेळाव्यात तपासणी करणाऱ्या सर्व रुग्णांचा ते पूर्ण बरे होईपर्यत पाठपूरावा ठेवला जाईल.या शिबिरात दिव्यांग व्यक्तींना पालकमंत्री डॉ. सावंत यांचे हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. ७ नोव्हेंबर २०१६ ते २७ नोव्हेंबर २०१६ या दरम्यान दिव्यांग वैद्यकीय तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीरात ३९१ लाभार्थी पात्र ठरले आहे. या कार्यक्रमात अवयवदान अभियानात योगदान देणारी संस्था, मरणोपरांत नेत्रदान करणाऱ्या रुग्णाचे नातेवाईक व अवयवदान संमत्तीपत्र देणारे भैयालाल निमजे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आरोग्य विभागाच्या वतीने घडीपुस्तिकेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवीशेखर धकाते यांनी केले. आभार प्रदर्शन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके यांनी केले. (प्रतिनिधी)
प्रत्येक रुग्णांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवा
By admin | Published: February 11, 2017 12:25 AM