भंडारा : मुलीला जन्म दिला; पण तिला अजूनही मनाप्रमाणे कवेत घेतले नव्हते. आईची माया तिनं पाहिलीच नाही. माझी मुलगी मला आणून द्या हो, असा टाहो योगिताने फोडताच उपस्थितांचे डोळे पाणावले. मृत पावलेल्या बालिकेच्या पार्थिवाची वाट बघत असताना, तिने ही संवेदना व्यक्त केली. भंडारा तालुक्यातील पहेलाजवळील श्रीनगर येथील रहिवासी असलेल्या योगिता विवेक धुळसे असे या मातेचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच योगिताने सुंदर मुलीला जन्म दिला. मात्र, प्रकृती ठीक नसल्याने तिला एसएनसीयू कक्षात दाखल करण्यात आले होते. सुखी संसाराच्या वेलीवर जन्म दिलेल्या कन्येसोबत आपण आनंदित जीवन जगू, या आशेने ती प्रेरित होती. मात्र, शनिवारची रात्र तिच्यासाठी वैररात्र ठरली. शनिवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत बालिका होरपळून ठार झाल्याचे वृत्त तिला देण्यात आले, तेव्हापासून तिच्या डोळ्यांतून सारख्या अश्रूच्या धारा वाहत आहेत. तुम्ही माझ्या बालिकेला कुठेतरी नेऊन ठेवलं असेल, मला माझी मुलगी आणून द्या, असेही ती वारंवार बोलत होती. श्रीनगर येथील तिच्या घरी जेव्हा मृत बालिकेला आणण्यात आले तेव्हा तिने फोडलेला टाहो दगडालाही पाझर फुटणारा ठरला. साहेब, माझी मुलगी आणून द्या हो, या दुःखाच्या विवंचनेत ती एकच शब्द रटत होती.
माझी मुलगी मला आणून द्या हो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 4:27 AM