पालांदूर (भंडारा) : प्रेम प्रकरणातून बहिणीशी लग्न केल्याचा राग डोक्यात ठेवून साळ्यांनी बहीण जावयावर कुऱ्हाडीने मानेवर प्राणघातक हल्ला केला. यात ओमप्रकाश बळीराम पडारे (२७) रा. जैतपूर, ता. लाखांदूर असे जखमी झालेल्या बहीण जावयाचे नाव आहे. संजित घटारे (२६) व रंजित घटारे (२८) रा. जैतपूर (बारव्हा) ता. लाखांदूर अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास कवडसी/ खैरी येथे घडली. आरोपी व जखमी एकमेकांच्या जवळचे नातेवाईक आहेत.
ओमप्रकाश पडारे हा लाखनी तालुक्यातील गुरढा येथे ट्रॅक्टरवर काम करतो. दैनंदिन उपयोगाचे साहित्य आणण्याकरिता जात असताना पालांदूरच्या पुढे कवडसी/ खैरी येते पंचशील बुद्धविहाराच्या पुढे संजीत व रंजीत घटारे यांनी आमोरासमोर येऊन जखमीच्या दुचाकीला धडक देत त्याला खाली पाडले. दोन्ही भाऊ एकाच मोटारसायकलवर स्वार होते. जखमी हा एकटाच मोटारसायकल चालवीत होता. याचवेळी जखमीचे चुलतभाऊ मागे दुचाकीने येत होते.
जखमीला दोन्ही भावांनी जमिनीवर पाडून संजित व रंजितने कुऱ्हाडीने वार केले. जखमी ओमप्रकाश रक्ताच्या थारोळ्यात पडला. एवढ्यात शेजारी असणारे रंजित वालदे व आशिष मेश्राम, दोन्ही रा. कवडसी यांनी वाचवण्याकरिता धाव घेतली. तेव्हा संजित व रंजित घटारे यांनी घटनास्थळावरून पळ काढला. गावकऱ्यांनी संजित घटारेला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. तर रंजीत हा कुऱ्हाड लगतच्या नहरात फेकून पसार झाला.
ओमप्रकाशचे चुलत भाऊ जगदीश पडारे व जयप्रकाश पडारे यांनी तत्काळ जखमीला पालांदूर येथे खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले. वृत्त लिहीपर्यंत उपचार सुरू होते. घटनास्थळावर ठाणेदार वीरसेन चहांदे, पोलिस शिपाई नावेद पठाण, मंगेश खुळसाम, ओमप्रकाश दिवटे, पाटील, दिघोरे दाखल झाले. वृत्त लिहीपर्यंत गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती.
रंजित वालदे व आशिष मेश्राम यांच्या धाडसाचे कौतुक
डोळ्यासमोर घटना घडत असताना क्षणाचाही विलंब न करता रंजित व आशिष यांनी जखमीला वाचविण्याकरिता धाव घेतली. आरडाओरड केली. वस्तीतली घटना असल्याने नागरिकांनी क्षणात गर्दी केली. त्यामुळे आरोपी घाबरले व पळ काढला. मात्र यात एकाला नागरिकांनी घटनास्थळावर पकडले. कवडशी येथील दोन्ही तरुणांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.