ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. थंडी पडू लागली आहे. थंडीत निवडणुकीचे गरम वारे वाहत आहेत. उमेदवारास जोश आलेला आहे. याचा प्रत्यय येत आहे. निवडणूक अर्ज ऑनलाईन दाखल करण्यासाठी सगळेच त्या साईटवर बसून आहेत. त्यामुळे दिवसाला ती साईट संथगतीने चालत असते अशी ओरड आहे. दिवसभर नेट कॅफेमध्ये एका जागी बसून गाव पुढारी कंटाळलेले असतात. भाऊ, रात्री नेट व साईट जोरात चालते काय असे मनस्ताप करून नेट कॅफेच्या मालकांना विचारतात. तेही त्यांच्या बोलण्याला ''''''''हो'''''''' देत या ना रात्री असे बोलून आपले दिवसा नित्याची कामे करतात.
गाव खेड्यात असणारे गाव पुढारी सामान्यतः शेतकरी असतात. तेही आपली शेतातली व घरची काम उरकून सवडीने तालुक्याला येतात. आपल्या सवंगड्याना सोबत घेवून येतात. इथे मग छोटी पार्टीही केली जाते. रात्री उमेदवारी अर्ज भरण्यास निवांतपणा मिळतो. कारण बहुदा रात्रीला जाम असलेली ती साईट मोकळी होते. त्यामुळे पटापट अर्ज दाखल करण्यास मदत होते.
पॅनलचे अधिक उमेदवार असल्याने वेळ लागतो. त्यामुळे स्थानिक पुढारी थंडीत रात्रीचा जागरण करून उमेदवारी अर्ज दाखल करीत आहेत.
ऑनलाईन अर्जदाखल करणे ही उमेदवारांची कसोटीच बघणे आहे. कधी साईट संथ, कधी नेटवर्कचा खोडा तसेच कागदपत्रांची जमवाजमव आदी भानगडीवर विजय मिळवून अर्ज भरण्याची प्रक्रिया केली जात आहे. अर्ज दाखल करण्यासाठी बँकेचे नवीन खाते उघडणे, बँकेची पास बुक घेणे ही नवीनच वाढ उमेदवारांना लागली आहे.
उमेदवारी दाखल करण्यास उमेदवारांना विविध दाखल्यांसाठी गरगर फिरावं लागते. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून ते नामनिर्देशन पत्र कायम राहण्यापर्यत ताण सहन करावा लागतो. त्यानंतरचे दिवस त्यांच्या परीक्षेचा काळ राहतो. प्रत्येक उमेदवार त्या परीक्षेत पास (निवडून येण्यासाठी) विविध आयुधांचा वापर करीत असतो. त्यानंतर प्रतीक्षा होत असते गुलाल उधळण करण्याची.
तालुक्यातील १७ ग्रामपंचायतच्या निवडणुका
मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव (सिरसोली.), पाहुणी/मेहुनी, दहेगाव, पिंपळगाव/ झंझाळ/ चोरखमारी, रोहा/ घाटकुरोडा, जांभोरा/ किसनपूर, पांजरा/ बोरी, पिंपळगाव( कां.), पाचगाव, मांडेसर/ रामपूर, भिकारखेडा/ धर्मापुरी, केसलवाडा/ लेंडेझरी, पारडी/ खोडगाव, खडकी/ बोंडे/ डोंगरदेव, देव्हाडा(बूज.)/ नरसिंह टोला, सालई(खुर्द)/ नेरला, ताडगाव/ सिहरी या दोन गावे मिळून बनलेल्या १७ गट ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे.
केवळ नऊ अर्ज दाखल
ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज दाखल करण्याचे तीन दिवस शिल्लक आहेत. शनिवार पर्यत केवळ देव्हाडा/ नरसिंहटोला येथील गावाचे नऊ अर्ज दाखल झाले आहेत.