साकोली (भंडारा) : सुटीवर आलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना साकोली तालुक्यातील पिंडकेपार येथे शनिवारी उघडकीस आली. शुक्रवारी सायंकाळी गावालगतच्या तलावाच्या दिशेने फिरावयास गेला असता तो बेपत्ता झाला होता. तलावात पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
ठकसेन आसाराम मडावी (३६) असे मृत जवानाचे नाव आहे. तो सीमा सुरक्षा दलात आसाम येथे कार्यरत होता. चार महिन्याच्या सुटीवर गावी आला होता. शुक्रवार, २९ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास गावालगत असलेल्या मारबत तलावाच्या दिशेने फिरावयास गेला होता. तलावात अचानक तोल जाऊन पडला. ही बाब काही वेळानंतर लक्षात आली. कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पाटील शंकर कापगते व तंटामुक्त समिती अध्यक्ष अंगराज समरीत यांनी पोलिसांना याबाबत सूचित केले.
पोलीस घटनास्थळी पोहचले. मात्र अंधार पडल्यामुळे शोध घेता आला नाही. शनिवारी सकाळी पुन्हा शोधमाेहीम सुरू झाली. गावातील मच्छीमार बांधवांनी शोध घेतला असता ठकसेन यांचा मृतदेहच हाती आला. साकोली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी साकोली उपजिल्हा रुग्णालयात आणला. ठकसेन मडावी यांच्या मागे पत्नी व दोन चिमुकल्या मुली, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. संपूर्ण गावावर या घटनेने शोककळा पसरली.