वर्षावास कार्यक्रम : श्रामणेरी रत्नावली यांचे प्रवचनजवाहरनगर : तथागत बुद्ध आपण देव वा देवदूत आहोत, असे कधीच सांगत नाही आणि असे कुणी मानल्यास त्याचे खंडण करीत असे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तथागत बुद्धांचा धम्म हा एक शोध होता आणि म्हणून जे धर्म साक्षात्कारी म्हणून समजले जातात त्यापासून तो आदी वेगळा समजला पाहिजे, असे निरुपण श्रामणेरी रत्नावली यांनी केले. आनंद बुद्ध विहार, ठाणा पेट्रोलपंप येथे वर्सावास प्रसंगी आपल्या प्रवचनात श्रामणेरी भिक्खुणी रत्नावली बोलत होत्या. त्या म्हणाल्या, बहुतेक धर्म हे साक्षात्कारी धर्म म्हणून वर्णिले जातात. तथागताचा धम्म हा साक्षात्कार नव्हे, साक्षात्कारी धर्म म्हणजे मी तुमचा निर्माता आहे, आत्म्याला मोक्ष मिळवून द्या, असे प्राणिमात्राला सांगणारा संदेश देत नाही. एखादा नियुक्त व्यक्तीच्या म्हणजे प्रेषिताच्या मार्फत पाठविलेला असतो. त्या संदेशाचा प्रेषिताला साक्षात्कार झालेला असतो आणि प्रेषित लोकांना तो साक्षात्कार उघड करून सांगतो. मग त्याला धर्म असे म्हणतात. तथागत बुद्धांचा धम्म हा एक शोध आहे. असे म्हणण्याचे तात्पर्य म्हणजे, पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या सखोल अभ्यासातून तो उद्भवलेला आहे. ज्या स्वाभाविक प्रवृत्तीत मनुष्य जन्म घेतो त्यांच्या क्रिया-प्रक्रिया आणि इतिहास व परंपरा याच्यामुळे मिळालेले बळ व संशोधनाचा परिणाम म्हणजे बुद्ध धम्म होय. यावेळी उपासक, उपासिका उपस्थित होते. पुढील पंधरा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक महासभा द्वारा आनंद बुद्ध विहार येथे वर्सावास निमित्त प्रवचन सुरू राहणार आहे. (वार्ताहर)
बौद्धधम्म हा एक शोध
By admin | Published: September 30, 2016 12:49 AM