देशभरातून भिक्खूंची उपस्थिती : आज संगीतमय कार्यक्रमाचे आयोजनसाकोली : तालुक्यातील आलेबेदर येथे दोन दिवसीय बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन त्रिरत्न बौद्ध विहार येथे अखिल भारतीय भिक्खू संघनायक भदंत सदानंद महास्थवीर यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिथी म्हणून भदंत सत्यशिल महाथेरो, भदंत अनिरुद्ध महाथेरो, भदंत महापंथ महाथेरो, भदंत कृपाशरण महास्थवीर, भदंत संघानंद महास्थवीर, भदंत नागदिपकर, भदंत शिलधन महास्थवीर, भदंत बुद्धघोष महास्थवीर, डॉ.भदंत धम्मसेवक महास्थवीर, भदंत प्रियदर्शी महास्थवीर, भदंत ज्ञानबोधी असे १०० भिक्खू मंचावर उपस्थित होते.यावेळी सम्यक सम्बुद्ध म्हणाले, सर्व दानात धम्मदान श्रेष्ठ आहे. धम्म कितीही चांगला असला तरी जोपर्यंत धम्मधारण करून आचरण करणारे, त्याग करून धम्माला चालना देणारे, धम्माचा संदेश ठिकठिकाणी पोहचवून धम्माला व संघाला धम्मदान देणारे लोक नसतील तर तो धम्मसुद्धा नष्ट होतो किंवा नाहिसा होतो. बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, विचार कितीही श्रेष्ठ असू दे, जोपर्यंत त्या विचारांचे संदेश वाहक नसतील, बुद्धी, कौशल्य, वेळ आणि पैसा खर्च करून प्रचार करणारे व आपल्या कमाईचा २० वा हिस्सा दान देणारे लोक नसतील तर ते श्रेष्ठ विचारसुद्धा संपुष्टात येतील. धम्माच्या विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.आलेबेदर येथील धम्म शिबिरात पुस्तकांचे स्टॉल लक्ष वेधत होते. प्रबोधनात्मक गीतांचे स्टॉलसुद्धा लावण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत डॉ.जे.डब्लू. सुखदेवे यांची चमू जनतेची आरोग्य तपासणी करणार असून, आॅल इंडिया रजिस्टर्ड बुद्धीष्ट सोसायटीतर्फे बौद्धांनी आपल्या टीसीवर बौद्ध करावे याविषयी कार्यकर्ते बौद्ध उपासकांना समजावून सांगत होते. भिक्खूवर्ग एका बाजूला उपासकांना बौद्ध तत्वज्ञान समजावून सांगत होते. समता सैनिक दलाची चोख बंदोबस्त असून प्रत्येक हालचालींवर त्यांचे लक्ष होते. कार्यक्रम शिस्तीत चालावे यासाठी समता सैनिक दलाचे कार्यकर्ते सक्रीय आहेत. बुधवारला भीमगीत जलसा कार्यक्रम होणार असून गायक अनिरुद्ध शेवाडे, मनोज कोटांगले, सुभाष कोठारे हे गायक उपस्थित राहणार आहेत. संगीतमय कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते होईल. यावेळी खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशिवार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)
आलेबेदर येथे बौद्ध धम्म परिषद
By admin | Published: March 15, 2017 12:27 AM