‘अच्छे दिन’ दूरच : डाळी, साखर, तेल, भाजीपाल्याचे दर गगनालाभंडारा : सत्ता कुणाचीही असो, सर्वसामान्य माणसाला त्याच्या दोन वेळ पोटाची खळगी भरण्याची चिंता असते. काही दशकापर्यंत केंद्रात व राज्यात काँग्रेसचे राज्य होते. त्यावेळी गरिबी हटावचा नारा देण्यात आला. पण गरिबी हटू शकली नाही. भाजपाने सत्तेत येण्यासाठी ‘अच्छे दिन’ चा नारा दिला. भाजप बहुमताने सत्तेत येऊन दोन वर्षे लोटली तरीही जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी न झाल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. दोन वषार्पूर्वी साधारणत: काही प्रमाणात महागाईचा सामना करावा लागत होता. जीवनावश्यक वस्तूंचे दर आकाशाला तितके भिडले नव्हते. आता अच्छे दिन येणार, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार, शिक्षणाचा फायदा होणार, जीवनावश्यक वस्तूंचे भाव नियंत्रणात राहणार अशी स्वप्न सर्वसामान्य नागरिक रंगवू लागले होते. पण दोन वर्षांच्या काळात जीवनावश्यक वस्तुच्या दरात एवढी वाढ झाली की तळहातावर आणून पोट भरणाऱ्यांना तर जगणेच कठीण होऊन बसले आहे. मागीलवर्षी रोजच्या वापरातील तुरीची डाळ ६५ ते ७० रूपये किलो, चणाडाळ ४० ते ४५ रूपये किलो होती. गोडे तेल ८५ ते ९० रूपये किलो, गहू १७ ते २० रूपये किलो, साखर ३० ते ३२ रूपये किलो या दरम्यान साहित्य मिळत होते. पण या दोन वर्षांत सणासुदीचे दिवस आले की जीवनावश्यक वस्तूंचे दर गगणाला भिडत असल्याचा अनुभव सामान्य नागरिक घेत आहेत. तूर डाळ १५० रूपये, चणा डाळ १२० रूपये किलो, गहू २२ ते २५ रूपये, साखर ४० रूपये, तेल ११० ते १२० रूपये किलो यासह ६० ते ८० रूपये किलो भाजीपाला असे दर कडाडले आहेत. मागील दोन वर्षांत पेट्रोल, डिझलचे दर १० रूपये लिटरने वाढले आहे. गरिबांचे रॉकेलही मिळेनासे झाले आहे. वीज वाचविण्यासाठी शासनाने वीजधारकांना कमी दरात एलएडी बल्ब दिले. पण वीजेच्या दरात वाढ केली. भारनियमन होणार नसल्याची घोषणा केली असली तरी ग्रामीण भागातील नागरिक अघोषित भारनियमन झेलत आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे बळीराजा मागील अनेक वषार्पासून आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्याच्या वेदना कुणालाच कळत नाही. उच्च शिक्षणासाठी लाखो रूपये खर्चूनही युवकांच्या हाती रोजगार नाही. खासगी कंपन्यामध्ये अत्यल्प पगारावर त्यांना काम करावे लागत आहे. त्यामुळे उच्च शिक्षणाचा उपयोग काय असा प्रश्न सुशिक्षित बेरोजगार शासनाला विचारत आहे. मजुरी करणारेही त्यांच्यापेक्षा जास्त कमवित असल्याने सुशिक्षितांमध्ये नैराश्य पसरत आहे. गृहिणींना घर कसे चालवावे असा प्रश्न पडला आहे. भाज्यांचे दर कडाडल्याने आणि दाळही महागल्याने करावे तरी काय असा प्रश्न त्यांना पडतो. जीवनावश्यक वस्तूंचे भाव वधारल्याने बजेट कोलमडले आहे. त्यामुळे हेच का ‘अच्छे दिन’ असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहे. (नगर प्रतिनिधी)रोजगार वाढले पण पत्ताच नाहीवर्षभरापासून सातत्याने रोजगारांत वाढ झाल्याचे सरकार सांगत आहेत. पण बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मग निर्माण झालेले रोजगार गेले कुठे हा प्रश्न बेरोजगार युवकांना पडला आहे. आगामी काळात अनेक क्षेत्रात लाखो रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. धान्याच्या किमती वाढल्याने तर काही पदार्थ हद्दपारच होत आहे.
महागाईमुळे बजेट कोलमडले
By admin | Published: August 04, 2016 12:37 AM