जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : गोलेवाडी, मिन्सीवासीयांची मागणीभंडारा : पहेला-गोलेवाडी मार्गावरील प्रलंबित पुलाचे बांधकाम व त्यासमोरील रस्त्याचे दुरूस्तीच्या बांधकामाचे ग्रामपंचायत गोलेवाडी व मिन्सीकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. पहेला ते गोलेवाडी मार्गावर नाल्यावरील १० ते १५ वर्षापासून पूल व त्यापुढील रस्ता दुरूस्तीचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्याकरिता संबंधित विभागासी विविध प्रकारचा पत्रव्यवहार, निवेदने, ठराव आदी प्रकारचे दस्तऐवज सादर केल्यानंतरही त्याकडे हेतुपरस्पर दुर्लक्ष केले जात आहे. त्याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देवून वेळ काढून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सदर काम सुरू करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग व गोसेखुर्द विभाग या दोन्ही विभागाचे योग्य ताळमेळ जुळत नसल्यामुळे काम सुरू करण्यासाठी अडसर निर्माण होत आहे. काम सुरू करण्यासंदर्भात दोन्ही विभागामार्फत सर्व प्रक्रिया पूर्ण असून सुद्धा काम सुरू करता येत नसल्याचे सांगितले जात आहे. या मार्गाने गोलेवाडी, मिन्सी, पन्नासी, लहानमिन्सी, येटेवाही, तिर्री आदी गावावरून नागरिक येणे जाणे करतात. पहेला हीच परिसरातील मोठी बाजारपेठ असल्यामुळे व्यापाऱ्यांना खूप आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. पहेला येथे शैक्षणिक केंद्र असल्यामुळे विद्यार्थ्यांना जाण्या येण्यास अडचण निर्माण होत आहे. रस्त्यावरून जाता येताना अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. रात्रीच्या वेळेस जाण्या येण्यास नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.पावसाळ्याच्या दिवसात तर नाल्याला पूर आल्यानंतर ४-५ दिवस रस्ता बंद असल्यामुळे व्यापारी वर्गाला आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील पुरामुळे वाहतूक बंद असतो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेवून प्रलंबित पुलाचे बांधकाम व त्यापुढील रस्ता दुरूस्तीचे काम येत्या १० दिवसात तत्काळपणे सुरू करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन देण्यात आले. तत्काळपणे काम सुरू न केल्यास गोलेवाडी, मिन्सी, पन्नासी, लहानमिन्सी, येटेवाही, तिर्री आदी सर्व नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल. होणाऱ्या संबंधित परिणामास आपण स्वत: जबाबदार असला, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी सरपंच दिपक पाटील, सरपंच रूपा शेंडे, दिपक बांगडे, सदस्य पराग हटवार, प्रभू मडावी, जालंदर दहिवले, गिता मडावी, आरती गणवीर, अनिता गणवीर, अनिता मडावी, राधा शेंद्रे, उपसरपंच मिलिंद रंगारी, अजित काटेखाये, एकनाथ शेंडे, ब्रम्हानंद शेंडे, जयंता शेंडे, अमृत शेंडे, संगणक परिचालक जितेंद्र वंजारी हजर होते. (नगर प्रतिनिधी)
‘त्या’ पुलाचे बांधकाम करा
By admin | Published: January 02, 2016 8:34 AM