२५ लोक ०६ के
भंडारा : मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर झालेला रस्ता दोन कंत्राटदार बदलून झाले तरी अजूनपर्यंत हा मार्ग झालेला नाही. भंडारा ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाला रहदारीला जोडणारा हा रस्ता खोकरला ते भोजापूरकडे कालव्याचा डांबरी रस्ता पूर्णपणे उखडला आहे. या रस्त्यावरील खडीकरण मोठे तीन बाय चार चौरस फुटांचे मोठेमोठे शेकडो खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून पायी चालणे धोकादायक झाले आहे. लोकांच्या सामान्य रहदारीस जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे चालण्यास अडथळा निर्माण झाला आहे. या रस्त्यावरून अवैध रेती, गिट्टीची वाहतूक मोठ्या प्रमाणात रोज होत आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, लोक रहदारीला अडथळे निर्माण होत आहेत.
या रोडवरून होणाऱ्या अवैध रेती, गिट्टी ट्रॅक्टर वाहतुकीस कोणाचेही नियंत्रण नाही. दररोज शेकडो अवजड वाहने ये-जा करीत असल्याने हा रस्ता खड्ड्यात दिसेनासा झाला आहे. अशा रीतीने होणाऱ्या या अवैध वाहतुकीस ग्रामपंचायत, महसूल खात्याचेसुद्धा नियंत्रण नाही. या रोडलगत प्रशांत प्राथमिक शाळा, गंगानगर खोकरला ही प्राथमिक शाळा असून, लहान मुलांची या शाळेत शिकण्यासाठी रोज ये-जा या मार्गाहून सुरू असते. या रोडवरील खड्ड्यांमुळे अनेक छोटेमोठे अपघात लहान मुलांचे आतापर्यंत झालेले आहेत. एखादेवेळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा रस्ता लोकवाहतुकीचा असल्याने पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना खूप मोठा त्रास होत आहे.
खोकरला ते भोजापूर कॅनल रोडवरील खड्डे त्वरित बुझवावेत व रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात येत आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. त्याप्रसंगी जिल्हाध्यक्ष यशवंत भोयर, शिशुपाल भुरे, गणेश नंदनवार, दिनेश निंबार्ते, संजय बांते, सचिन नागपुरे, सुनील राखडे, अतुल राघोर्ते, दिगांबर गाढवे, शंकर भेंडारकर, संदीप मारबते, शशिकांत देशपांडे, मुकुंदा सूर्यवंशी, विलास मरसकोल्हे, दीपक पडोळे, आकाश नवरंगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.