- संदीप वानखडे डोणगांव - येथून जवळच असलेल्या नागापूर येथे २० एप्रिलच्या रात्री शेतातील गाेठ्यावर वीज काेसळली. त्यामुळे गाेठ्याला आग लागून या आगीत एक गाय आणि एक म्हैस जळून खाक झाली. तसेच एक गाय आणि एक बैल ९० टक्के भाजला आहे. गाेठ्यातील साहित्यही जळाल्याने शेतकऱ्याचे सहा लाख ५७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.डाेणगाव परिसरात २० एप्रिल राेजी रात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. या पावसादरम्यान नागपूर येथील माधव प्रकाश गायकवाड यांच्या गाेठ्यावर वीज काेसळली. त्यामुळे गाेठ्याला आग लागून यामध्ये एक गाय आणि एक म्हैस जळून खाक झाली. तसेच एक गाय आणि एक बैल ९० टक्के भाजला आहे, या गाेठ्यात असलेले स्प्रिंकलरचे दाेन संच आणि पीयूसी पाईप, जनावरांचे खाद्य, हळद आणि इतर साहित्य असा ६ लाख ५७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच माजी कृषी सभापती राजेंद्र पळसकर व शिवसेना शहर प्रमुख सुरज दिनोरे, नागापूर सरपंच समाधान गायकवाड तसेच तलाठी व पशुसंवर्धन अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी तलाठी यांनी पंचनामा करून वरिष्ठांना सादर केला.
Buldhana: नागापूर येथे गाेठ्यावर वीज काेसळली, दाेन गुरे ठार
By संदीप वानखेडे | Published: April 21, 2024 3:03 PM