लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. घरोघरी कोणते पदार्थ बनवायचे, कोणती मिठाई खरेदी करायची आदींची प्लॅनिंग सुरू झाली आहे. अशावेळी 'बेस्ट बिफोर' म्हणजे तारीख पाहणे आवश्यक आहे. मिठाई खरेदी करताना फसवणूकही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही मिठाई खरेदी करताना 'बेस्ट बिफोरच' बघून खरेदी करावी, असे आवाहन अन्न व औषधी विभागाने केले आहे.
अनेकजण दिवाळीचा फराळ विविध गावांत तसेच देश-विदेशांत पाठवत असतात. आता उपाहारगृहे, हॉटेल्स येथे फराळ व मिठाई बनविण्यास सुरुवात झाली आहे. अधिक नफा मिळविण्याच्या अनुषंगाने हॉटेल्स संचालक, उपाहारगृह, मिष्टान्न भांडार चालक फसवणूक करण्याची शक्यता आहे.
बहुतेकवेळा तर मुदतबाह्य पदार्थसुद्धा विकण्याचे प्रकार उघडकीस येतात. बरेचदा मिठाई किंवा दुग्धजन्य पदार्थाचा वापर केव्हापर्यंत करायचा, यासंदर्भात त्या मिठाई किंवा दुग्धजन्य पदांवर लिहिलेले नसते. परिणामी हलके व बुरशी चढलेले पदार्थही ग्राहकांच्या माथी मारले जातात. ते खराब पदार्थ सेवन केले की, अनेकांची प्रकृती खालावण्याची शक्यता असते. त्यामुळे असे कोणतेही पदार्थ खरेदी करता पूर्णतः तपासणी करून खरेदी करावी. त्यामुळे ग्राहकांनी मिठाई खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन अन्न औषधी प्रशासनाने केले आहे.
बेस्ट विफोर लिहिणे आवश्यक प्रत्येक मिठाई व दुग्धजन्य पदार्थाच्या ट्रेसमोर बेस्ट बिफोर लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. काही जण लिहितात, तर काही जण दुर्लक्ष करतात; मात्र आपण खरेदी करताना संपूर्ण चौकशी करून केव्हा बनवले, किती दिवस चालणार, हे बघूनच खरेदी करावे. सर्व ग्राहकांनी सजग असावे. पाकीटबंद, दुग्धजन्य पदार्थ मिठाई खरेदी करत असताना ते किती दिवस चालणार आहेत, याची तपासणी अवश्य करावी.
भेसळ होऊ नये म्हणून पथक स्थापनदिवाळीच्या काळात भेसळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्न व औषध विभागाने पथक स्थापन केले आहे. भेसळ प्रकार लक्षात आला तर अन्न व औषध प्रशासन विभागाला सांगितले पाहिजे. पदार्थ खरेदी करताना ताजे आहे का, शिळे तर नाही ना, असेही विचारावे.
"अन्न व औषध विभाग भेसळीवर लक्ष ठेवून राहणार आहे. भेसळ लक्षात असल्यास संशयित नमुने घेऊन तपासणीला पाठवले जाणार आहेत. दोष आढळून आल्यास त्या दुकानदारावर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांना भेसळयुक्त पदार्थ आढळून आल्यास तत्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाला कळवावे."-प्रशांत देशमुख, सहायक आयुक्त, भंडारा