भंडारा : रबी हंगाम धान खरेदीसाठी काढण्यात आलेले अन्यायकारक परिपत्रक त्वरित रद्द करावे, खरीप हंगामातील धानाचा थकीत बोनस तात्काळ द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार डाॅ. परिणय फुके यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना त्यांनी दिले.
सर्वत्र कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. शेतकऱ्यांची त्यामुळे मोठी कुचंबणा होत आहे. पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. जिल्ह्यातील शेतकरी खरीप व रबी अशा दोन हंगामात धान घेतो. खरीपाच्या धानाची खरेदी करण्यात आली. एकट्या भंडारा जिल्ह्यात ३७ लाख क्विंटल धानाची खरेदी झाली. शेतकऱ्यांना आधारभूत किमतीनुसार चुकारे मिळाले परंतु अद्यापही त्यांना बोनसची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. दुसरीकडे रबी हंगाम धान खरेदीचा तिढा सुटायचे नाव घेत नाही. अलिकडे शासनाने धान खरेदीबाबत आदेश दिले. परंतु १९ मे रोजी एक अन्यायकारक परिपत्रक काढले. ३१ मे पर्यंत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचे धान खरेदी करणे बंधनकारक नसल्याचे त्यात म्हटले आहे. शेतकऱ्यांचे धान पणनने खरेदी केले नाही तर व्यापाऱ्यांना कमी किमतीत विकावे लागेल. कोरोना संकटात आणखी भर पडेल. यामुळे शासनाने हे अन्यायकारक परिपत्रक रद्द करावे अशी मागणी या निवेदनातून आमदार परिणय फुके यांनी केली आहे.
लवकरच बैठक
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तात्काळ धानाची खरेदी बोनसची रक्कम व रबी हंगामातील उचल करण्याकरिता काढण्यात आलेले परिपत्रक रद्द करण्याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन आमदार डाॅ.परिणय फुके यांना दिले आहे. आता सर्वांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.