करडी(पालोरा): लोकशाहीचा प्रथमोत्सव म्हणून ग्रामपंचायत निवडणुकांकडे पाहिले जाते. ग्रामपंचायत निवडणूक अतिशय काट्याची होत असून मतांचे अंतर अतिशय कमी असते. बऱ्याचदा उमेदवार दोन-चार मतांनी हरलेले असतात. अशाच धीरगंभीर बातावरणात करडी परिसरातील जांभोरा, खडकी, पांजरा(बोरी), देव्हाडा व केसलवाड आदी ५ गावांतील ४५ जागांसाठी ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडत आहेत. ४ जानेवारी रोजी प्रचारचिन्हांचे वाटप करण्यात आले असून प्रचाराला प्रारंभ झाला आहे. बॅनर व पोस्टर्सने चौक सजले असून पहिल्या टप्प्यात वैयक्तिक गाठीभेटीवर उमेदवारांनी भर दिला आहे.
करडी परिसरातील जांभोरा येथे ११ जागांसाठी, खडकी व देव्हाडा येथे ९ जागांसाठी तर केसलबाड़ा व पांजरा(बोरी) येथे प्रत्येकी ७ जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली असून मतदान १५ जानेवारी रोजी होणार आहे. गावातील अनेक कुटुंबे रोजगाराच्या शोधात गावाबाहेर व शहरात राहतात. यामध्ये भंडारा, गोंदिया, तुमसर, साकोली, तिरोडा, लाखनी व नागपूर शहरांचा समावेश आहे. अन्यवेळी त्यांची
आठवण राजकारण्यांना येत नसली तरी ग्रामपंचायत निवडणुकांत मतांचे गणित जुळविण्यासाठी त्यांची प्रामुख्याने आठवण केली जाते. बाहेरील् मतदार कोणाच्या जवळचा आहे, आपल्याला मते मिळणार काय, याचा हिशेब लावून त्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यावरसुद्धा लक्ष दिले जात आहे. एकाच कुटुंबातील व नातेवाईक असलेले अनेक उमेदवार निवडणूक रिंगणात कुटे पक्ष गटांकडून तर कुठे अपक्ष असल्याने मतदान न मिळण्याच्या भीतीने बोलाचाली बंद झाली आहे.
कोरोना संकटाचा विसर
सध्या कोरोना संकटकाळ सुरू असला तरी ग्रामपंचायत निवडणुकांमुळे उमेदवार व मतदारांवर चर्चेचे गुन्हाळ सुरू झाले आहे. निवडणुकीच्या धामधुमीमुळे कोरोनाची भिती आता ग्रामीण भागातून नाहीसी झाल्यागत स्थिती आहे. कुणाच्याही तोंडावर मास्क दिसून येत नाही. सोशल डिस्टन्स तर नावालाही शिल्लक नाही. निवडणुका जिकण्यासाठी गावपुढारी सज्ज झाले आहेत.
बॉक्स
महिला उमेदवारांनी वाढविले टेन्शन
ग्रामपंचायत निवडणुकीत ५० टक्के उमेदवारी महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे पुरुषांपेक्षा प्रत्येक ग्रामपंचायतीत महिला उमेदवारांची संख्या एकने अधिक आहे. परंतू खर्च करण्याची क्षमता लक्षात घेता गटनेते पुरुषांवर अधिक विश्वास दाखवून आहेत. त्यामुळे गटनेत्यांच टेेन्शन महिला उमेदवारांनी वाढविले आहे.
बॉक्स
मतांच्या गोळाबेरजेवर भर
ग्रामपंचायत निवडणूक अतिशय चुरशीची व काट्याची झुंज असते, त्यामुळे प्रत्येक उमेदवार आपापल्या मतांवर बारीक नजर ठेवून आहेत. वाॅर्डातील कौटुंबिक प्राबल्य, मतांची संख्या आणि स्वत:ला मिळणाऱ्या मतांची गोळाबेरीज करण्यात व्यस्त आहे. निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक मते न जुळाल्यास कुठून भरपाई होणार याची तजवीज करण्यावर भर दिला जात आहे.