राजू बांते लोकमत न्यूज नेटवर्क मोहाडी : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी व महायुतीमधील नेत्यांना समजावण्यात वेळ जात आहे. त्यांच्या बैठका होत आहेत. अंतिम नामनिर्देशन मागे घेण्याच्या दिवसानंतर उमेदवारांचा प्रचार सुरू होणार आहे. केवळ १४ दिवसांत २६६ गाव उमेदवारांना पिंजून काढावे लागणार आहेत.
निवडणूक कार्यक्रमानुसार तुमसर - मोहाडी विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांना मोहाडी तालुक्यातील १०७ गाव तर तुमसर तालुक्यातील १५९ गाव-पाडे पिंजून काढावे लागणार आहेत. तुमसर तालुका काहीअंशी आदिवासीबहुल आहे. आंबागड, गायमुख या भागातील सातपुड्याच्या पायथ्याशी काही प्रमाणावर आदिवासींची वस्ती आहे.
मध्यप्रदेशच्या सीमांकनापर्यंत असलेला बपेरा गाव, दुसरीकडे डोंगरी बुद्रुक असा चौफेर तुमसर तालुका विस्तारलेला आहे. तसेच मोहाडी तालुका दोन भागात विभाजित झालेला आहे. हिवरा गावापर्यंत इकडे पाहुणी, भोसा वैनगंगा नदीच्या दुसऱ्या भागाला खडकी, देव्हाडा बुद्रुक असा विस्तारलेला मोहाडी तालुका आहे. त्यामुळे प्रचार करताना निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांना चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे.
उमेदवार कुणीही असो, सर्वांना अनेक गावे १४ दिवसांत पिंजून काढावी लागणार आहेत. प्रचाराला दिवस कमी आणि गावे जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. १४ दिवसांचा कालावधी प्रचार करण्याचा असल्यामुळे किमान १९ गावात प्रत्येक दिवशी मतदारांकडे जावे लागणार आहे.
प्रचार होणार हायटेक प्रचार म्हटला की, पूर्वी हातात झेंडे, पत्रके किवा वाहनांवर भोंगे लावून प्रचार केला जात होता. आता तो प्रकार अत्यंत कमी बघायला मिळतो. जमाना हायटेक झाला आहे. जुन्या पद्धती बाजूला सारून आता कार्यकर्ते स्मार्ट सिस्टीमचा अवलंब करू लागले आहेत. स्मार्ट फोनच्या माध्यमातून विविध पक्षांचे नेते व त्यांचे कार्यकर्ते फेसबुक व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून प्रचाराला प्रारंभ केला आहे. ४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. ५ नोव्हेंबरपासून रिंगणातील उमेदवारांच्या मोठ्या प्रमाणात प्रचाराचा धुरळा उडणार आहे.
उमेदवारांपुढे आव्हान २० नोव्हेंबर ही मतदानाची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांचे समर्थक सोशल मीडियाच्या वापरात अग्रेसर दिसणार आहेत. कमी वेळेत समर्थक उमेदवारांचा प्रचार आणि विरोधक उमेदवारांचा नकारात्मक प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून करणार असल्याचे चित्र आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रचार हायटेक होणार आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअॅप सोशल मीडियाचा प्रचारासाठी वापर वाढला आहे. तरीही उमेदवाराला मतदारांच्या संपर्कासाठी एकदा तरी जावेच लागणार आहे. दुसरीकडे, सध्या व्हॉट्सअॅप संवाद साधण्याचे अतिमहत्त्वपूर्ण माध्यम बनले आहे. या माध्यमातून संपर्कात राहण्याचा प्रयत्न असतो. याचा प्रचारात वापर होणार असल्याचे सध्यातरी दिसत आहे.