भंडारा : पालिकेच्या नव्या प्रभागरचनेनुसार दोन वॉर्डाचा एक प्रभाग करण्यात आला. यात अनेक वार्डांचे विभाजन झाल्यामुळे जुने प्रभाग विखुरले गेले आहे. अशातच आरक्षण बदलामुळे अनेकांना कसरत करावी लागणार आहे. आगामी निवडणुकीत वॉर्डातून आपली जागा पक्की राहावी, या उद्देशाने इच्छुकांनी दररोज सकाळी व सायंकाळी भ्रमंती सुरू केली आहे. काहींनी नव्या प्रभागातून निवडणूक लढविण्याची योजना आखली आहे. नगराध्यक्षपद आरक्षण सोडतीकडेही अनेकांचे लक्ष लागले असून या आरक्षण सोडतीनंतर नव्या समिकरणांना दिशा मिळण्याची शक्यता आहे. ३२ सदस्यीय भंडारा नगर पालिकेत १६ महिला सदस्य आहेत. आता एक महिला सदस्य वाढणार आहे. नव्या आरक्षणानुसार नगराध्यक्ष बाबूराव बागडे, माजी नगराध्यक्ष वर्षा धुर्वे, नगरसेविका गीता सतदेवे, आशा उईके, पृथ्वी तांडेकर, किरण व्यवहारे, संध्या धनकर, ज्योती गणवीर, महेंद्र निंबार्ते, सुर्यकांत ईलमे यांच्या वॉर्डातील आरक्षण बदलले आहे. तरीसुद्धा यातील अनेकांच्या वॉर्डात दुसरा भाग जोडल्या गेल्याने त्यांच्यासाठी निवडणूक लढण्याची संधी आहे. परंतु त्यासाठी अधिक मेहनत घेण्याची वेळ आली आहे. या स्थितीत उमेदवारीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नगराध्यक्षपद थेट जनतेतून निवडून देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. या आरक्षण सोडतीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. अशातच पालिका ताब्यात राहावी, यासाठी राजकीय पक्षांकडूनही निवडून येण्याची क्षमता असलेल्यांचा शोध सुरू आहे. एकीकडे ईच्छूक वॉर्डात भ्रमंती करीत असताना दुसरीकडे नव्या प्रभागरचनेत कोणत्या उमेदवाराला कोणता प्रभाग दिल्यास फायद्याचे ठरेल, असे विचार करून सक्षम उमेदवार शोधण्याचे काम पक्षस्तरावर सुरू आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
इच्छुकांकडून प्रभाग भ्रमंतीवेध पालिका निवडणुकीचे : लक्ष नगराध्यक्षपद आरक्षण सोडतीकडे
By admin | Published: July 13, 2016 1:37 AM