भंडारा : भंडारा शहरातील खातरोड येथील गणेश पेठकर यांच्या मालकीच्या गणेश कॅरम सेंटर आग लागल्याची घटना रविवारला पहाटे अंदाजे ३:४५ वाजताच्या सुमारास घडली. भीषण आगीत सुमारे ३ लाख ७८ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जळून खाक झाला. आग लागण्याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.
अयोध्या नगर खातरोड खोकरला निवासी गणेश शिवचरण पेठकर यांनी मागील तीन वर्षापूर्वी खातरोडवरील डॉ. गोंदूळे यांचा दवाखाना जवळ कॅरम सेंटर लावले होते. त्यांच्या कुटुंबाचा प्रपंच यावर चालत होता. परंतु, रविवारला पहाटे ३:४५ ते ४:०० वाजताचे सुमारास त्यांच्या कॅरम सेंटरला भीषण आग लागली. घटनेची माहिती होताच ठाणेदार सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली भंडारा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने घटनेचा पंचनामा केला.
आगीत अंदाजे ८ ते १० कँरम, एक फ्रीज, कुलर, कॅरम स्टॅड, पंखे व घरातील काही साहित्य, असा एकून ३ लाख ७८ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. सुदैवाने या अग्नितांडवात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. ही आग लागली की लावण्यात आली, ही बाब अद्यापही स्पष्ट झालेले नाही. घटनेची तपास ठाणेदार सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.