फोटो
चुल्हाड (सिहोरा) : उन्हाळी धानाचे चुकारे अडल्याच्या कारणावरून भाजपच्या वतीने सिहोरा येथे भंडारा बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. चर्चेत तोडगा निघाला नसल्याने आंदोलनकर्त्यांनी पुन्हा १५ दिवसांचा अल्टिमेटम शासनाला देण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांची अटक व सुटका करण्यात आली आहे. आंदोलनाचे नेतृत्व माजी खासदार शिशुपाल पटले, माजी आमदार चरण वाघमारे, तारिक कुरेशी यांनी केले.
उन्हाळी धानाचे चुकारे गेल्या तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांना मिळाले नाही. यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाचे गर्तेत जात आहे, आर्थिक अडचणीचा सामना करीत असताना राज्य सरकार गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. या शिवाय बोनसची अर्धी राशी मिळालेली नाही. शासन ठोस उपाययोजना करीत नाही. फक्त कागदी घोडे नाचवत वेळ मारून नेली जात आहे. शेतकऱ्यांना आश्वासनाचे गाजर दाखवीत आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात निधीअभावी बोजवारा सुरू आहे. नदीपात्रातून गाळ उपसा करण्यात येत नसल्याने पाण्याचा उपसा करताना अडचणी येत आहेत. पंपगृहामध्ये अनेक समस्या आहेत. मान्सून पूर्व या समस्या निकाली काढण्यात येत नाही. यामुळे जलद गतीने पाण्याचा उपसा चांदपूर जलाशयात होत नाही. राज्य सरकारने नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. खरीप हंगामात सुरू असताना खत पुरवठा करण्यात येत नाही. कृषी विभागाची यंत्रणा असताना चौकशी व कारवाई करीत नाही. या व अन्य विषयाला घेऊन सिहोरा गावात राष्ट्रीय महामार्गावर भाजपच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११ वाजेपासून परिसरातील शेतकरी आंदोलनस्थळी जमा झाले, या रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व माजी खासदार शिशुपाल पटले, माजी आमदार चरण वाघमारे, तारिक कुरेशी, तालुकाध्यक्ष राजेश पटले, किसान आघाडीचे सुभाष बोरकर यांनी केले. रास्ता रोको आंदोलनात राज्यातील महाआघाडी शासनाचा खरपूस समाचार घेण्यात आला. नंतर आंदोलनकर्त्यांचे विषयावर चर्चा करण्यात आली, चर्चेत तहसीलदार तेले, कार्यकारी अभियंता कुरझेकर, उपविभागीय अभियंता सिंग, स्नेहल सोनटक्के, पोलीस निरीक्षक पाटील, न्यायमूर्ती, सहाय्यक पोलीस निरीक्षक शहारे उपस्थित होते. शेतकरी व जनसामान्यांना न्याय देणाऱ्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. परंतु चर्चेत तोडगा निघाला नाही.
आंदोलनकर्त्यांना भरीव आश्वासन मिळाले नाही. यानंतर भाजपचे नेते व कार्यकर्ते थेट राष्ट्रीय महामार्गावर आले. माजी खासदार शिशुपाल पटले, माजी आमदार चरण वाघमारे, तारिक कुरेशी, तालुकाध्यक्ष राजेश पटले, सुभाष बोरकर, किशोर राहगडाले, सतीश चौधरी, बंटी बानेवार, देवानंद लांजे, बंडू बनकर, डॉ. अशोक पटले, विकास बिसने, नंदू राहंगडाले, अंबादास काणतोडे, पिंटू हूड, मयूरध्वज गौतम, गजानन निनावे, मोतीलाल ठवकर, योगराज तेंभरे, सचिन खांगार, गोपाल येडे, नंदू तुरकर, विनोद पटले, डॉ. मुरलीधर बानेवार, मुन्ना फुंडे, भास्कर सोनवणे, अमित जयस्वाल, सुनील पटले यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक विस्कळीत होणार नाही, याकरिता आंदोलनकर्त्यांना अटक व सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी शासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. पुन्हा बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनस्थळी शेतकरी व जनसामान्य नागरिकांची गर्दी लक्षात घेता पोलीस निरीक्षक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शहारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. यावेळी अतिरिक्त कुमक मागविण्यात आली होती.