भंडारा : ग्रामपंचायत कार्यालय, पिंपरी पुनर्वसन येथे भारत सरकारच्या खेळ व युवा कार्य मंत्रालयअंतर्गत नेहरू युवा केंद्र, भंडारातर्फे जल जागृतीसाठी 'क्याच द रेन' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक पाणी व्यवस्थापन व जैविक शेती विशेषज्ञ डॉक्टर नितीन तुरस्कर हे होते. तसेच नेहरू युवा केंद्र, भंडाराचे तालुका प्रतिनिधी प्रियंका बारस्कर, पिंपरी येथील सरपंच रुपाली लांबट प्रामुख्याने उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक डॉ. नितीन तुरस्कर यांनी, जल संवर्धन या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, जल संवर्धनासाठी 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' काळाची गरज आहे. भविष्यासाठी आपण पाण्याचे साठे कसे वाचवू शकतो. पावसाचे पाणी वाचविण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात. शोष खड्ड्यांमध्ये पाणी कसे साठविले जाते. छतावरून पडणारे पाणी व त्याचे नियोजन कसे करायचे, हे सांगितले. जल संवर्धनावर ते म्हणाले, शेतीला पाणी देण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा उपयोग करणे गरजेचे आहे. शेतीला एका वेळेस पाटातून पाणी दिले तर ते माती व गाळ वाहून जाते. परंतु पूर्ण ठिबक सिंचन पद्धतीने शेतीला पाणी दिले, तर शेतीला पाणी पूरक होते. माती व गाळ वाहून जात नाही आणि शेती खडकाळ होत नाही.
डॉ. नितीन तुरस्कर यांनी विषमुक्त जैवीक शेती, स्वास्थ्य संवर्धन, रोजगारासाठी मधमाशी पालन तसेच यासाठी शासकीय अनुदान व योजनांची सखोल माहिती दिली. यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष देविदास ठवकर, भाऊ कातोरे, नेहरू युवा केंद्राचे शालू पिल्लारे, पिंपरी ग्रामपंचायत सदस्य, परिसरातील शेतकरी, युवा मंडळाचे कार्यकर्ते, युवा स्वयंसेवक उपस्थित होते.