भंडारा शहरापासून हाकेच्या अंतरावर कोका वन्यजीव अभयारण्य आहे. १८ जुलै २०१३ रोजी निर्मित हे अभयारण्य १०० चौरस कि.मी. परिसरात पसरले आहे. या अभयारण्यात वाघ, बिबट, अस्वल यासह विविध प्रजातींचे हिंस्त्र आणि तृणभक्षी प्राणी आहेत. यासोबत पक्ष्यांचीही मोठी संख्या आहे, तसेच विविध प्रजातींचे वृक्ष आहेत. अभयारण्याच्या संरक्षणासाठी वन्यजीवची यंत्रणा सक्षम असली तरी उन्हाळ्यात वणवा लागण्याच्या घटना घडतात. अनेकदा या आगी कृत्रिम असतात. यामुळे वनसंपदेचे मोठे नुकसान होऊन पशू, पक्षी होरपळले जातात. यावर अंकुश ठेवण्यासाठी वन्यजीव विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. यावर्षीच्या वणवा हंगामाला प्रारंभ झाला असून, वन्यजीव विभागाने फायर लाइनसह विविध उपाययोजना केल्या आहेत.
वणवा लागण्याच्या घटनांचे कारण शोधण्यासाठी आता वन्यजीव विभाग सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेत आहे. वन्यजीवांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि रेती तस्करीला आळा घालण्यासाठी गत वर्षभरापूर्वी अभयारण्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. आता आग नियंत्रण आणि कठोर कारवाईसाठी या कॅमेऱ्यांचा उपयोग केला जाणार आहे.
बॉक्स
कृत्रिम वणवा लावल्यास कठोर कारवाई
कोका अभयारण्यालगत अनेक गावे आहेत. या गावातील नागरिक जंगलात शिरतात. मोहफूल, तेंदूपत्ता संकलनासाठी ही मंडळी जंगलात जातात, तसेच मधपोळे काढण्यासाठीही आग लावण्याच्या घटना घडतात. यामुळे वन्यजीव आणि वृक्षांचे मोठे नुकसान होते. आता सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याने कृत्रिम वणवा लावणारे त्यात कैद होतील आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.
कोट
कोका अभयारण्यात आग नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी राखीव क्षेत्रात प्रवेश करू नये. वनसंपदेच्या रक्षणासाठी सहकार्य करावे. कुठे आग लागल्याचे दिसताच वन्यजीव विभागाला तात्काळ कळवावे.
-सचिन जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी कोका अभयारण्य.