लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बु.) : लाखांदूर तालुक्यात मग्रारोहयो अंतर्गत बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांच्या कामांमध्ये सुमारे दोन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप रोहयो समिती सदस्य उत्तम मेश्राम आणि चंद्रभान वानखेडे यांनी केला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांकडे तक्रार करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.लाखांदूर तालुक्यात सन २०१५-१६ मध्ये मग्रारोहयोच्या कुशल कामांतर्गत अनेक गावांमध्ये सिमेंट रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले. सदर सदस्यांनी यापैकी ३१ ग्रामपंचायतीच्या ७० कामांची पाहणी केली असता ही बांधकामे निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळले. या बांधकामात अंदाजपत्रकानुसार उभ्या ७ ते ९ आणि आडव्या १ - १ फुटावर सळाखी वापरण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या रस्त्यांच्या बांधकामात संबंधित कंत्राटदारांनी अधिकारी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी संगनमत करून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केल्याचा आरोप सदर सदस्यांनी केला आहे. प्राप्त तक्रारीनुसार या कामांमध्ये १ कोटी ९६ लाख २७ हजार ६६१ रुपयांचा गैरप्रकार झाला आहे.या गैरप्रकाराविषयी सदर सदस्यांनी ५ मे २०१६ ला जिल्हाधिकारी, खंडविकास अधिकारी आणि तहसीलदारांकडे तक्रार केली. मात्र संबंधितांकडून या तक्रारीला केराची टोपली दाखविण्यात आली. २१ जून २०१६ रोजी भंडारा जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री डॉ.दिपक सावंत यांच्याकडे तक्रार केली. पालकमंत्र्यांनी या तक्रारीची दाखल घेऊन चौकशीचे आदेश दिले. परंतु तक्रार निवारण प्राधिकरण (मग्रारोहयो)चे अधिकारी लोणारे यांनी संबंधित ग्रामपंचायतचे पदाधिकारी, तांत्रिक पॅनल, खंडविकास अधिाकरी व संबंधित रोजगार सेवक यांना भंडारा येथे आपल्या कार्यालयात बोलावून कागदोपत्री थातूरमातूर चौकशी करून प्रकरण गुंडाळच्याचा प्रयत्न केला.या प्रकरणी काहीच ठोस कारवाई होत नसल्याचे पाहून या सदस्यांनी शिवसेनेचे लाखांदूर तालुका प्रमुख अरविंद बनकर यांच्या मदतीने आपला लढा कायम ठेवला. सर्व वरिष्ठ अधिकारी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहून बनकर यांनी या प्रकरणाची तक्रार थेट ग्रामविकास मंत्रालयात केली. त्यांनी मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, ग्रामविकास राज्यमंत्री यांच्याकडे सदर भ्रष्टाचार प्रकरणाची तक्रार केली आहे.खंडविकास अधिकाºयांनी स्पॉट निवडावा. त्या स्पॉटवर १ मिटर लांब व ३ मिटर रुंद रस्ता सर्वांसमक्ष फोडून चौकशी करावी, रस्त्याच्या अंदाजपत्रकानुसार फोडलेल्या क्षेत्राचा खर्च २ हजार ८५० रु. तालुका शिवसेना भरण्यास तयार आहे.- अरविंद बनकर,शिवसेना तालुका प्रमुख लाखांदूरतालुक्यातील मग्रारोहयो अंतर्गत झालेली सर्व सिमेंट रस्त्यांची बांधकामे अंदाजपत्रकानुसारच झाली आहेत. मनरेगाची वेबसाईट असून कामांच्या प्रगतीचा अहवाल फोटोसह वेळोवेळी शासनाला पाठवावा लागतो. त्यामुळे या कामात पूर्ण पारदर्शकता असून कुठेही गैरप्रकार झालेला नाही. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे.- डी.एम. देवरे, खंडविकास अधिकारी, लाखांदूर
लाखांदूर तालुक्यातील सिमेंट रस्ते ठरले भ्रष्टाचाराचे कुरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 10:15 PM
लाखांदूर तालुक्यात मग्रारोहयो अंतर्गत बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांच्या कामांमध्ये सुमारे दोन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप रोहयो समिती सदस्य उत्तम मेश्राम आणि चंद्रभान वानखेडे यांनी केला आहे.
ठळक मुद्देरोहयो समिती सदस्यांचा आरोप : प्रकरण दडपण्याचा प्रयत्न, चौकशीची मागणी