चुल्हाड रस्त्यावर अपघात वाढले : मुदत संपल्यावरही काम अपूर्ण
रंजित चिंचखेडे
चुल्हाड (सिहोरा) : सिंदपुरी चुल्हाड वाहनी रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्याची मुदत संपली असतानाही डांबरीकरणाच्या कामांना सुरुवात करण्यात आली नाही. कंत्राटदाराने गावांत सिमेंट रस्त्याचे बांधकाम केले असले तरी रस्त्याचे कडेला मुरूम घालण्यात आले नसल्याने रस्ताच नागरिकांच्या जीवावर उठला आहे. वाहन चालकांचे अपघात वाढले आहे. यामुळे रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
चुल्हाड सिंदपुरी वाहनी गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण व सिमेंट रस्ते , नाली बांधकामांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. ५.९९० किमीच्या रस्ता बांधकामासाठी ३ कोटी ८४ लाख ३७ हजार रुपयांचे खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. चुल्हाड गावात ०. ९२० किमीच्या रस्त्याचे बांधकाम सिमेंट काँक्रिटचे करण्यात आले आहे. परंतु या सिमेंट रस्त्याचे कडेला मुरूम घालण्यात आले नाही. यामुळे वाहने कोसळत आहेत.
गावात रस्त्याचे कडेला मुरूम घालण्याची ओरड गावकरी करीत आहेत. परंतु कंत्राटदार ऐकत नसल्याची माहिती मिळाली आहे. कंत्राटदाराने शासनाचा महसूल बुडविण्यासाठी विना रॉयल्टीचा मुरूम सिमेंट रस्त्याचे कडेला घालण्याचा प्रयत्न केला होता. परंतु नियमबाह्य असल्याचे कारणावरून गावात गोंधळ निर्माण झाला होता. साधे खडीकरण करण्यात आले नाही. रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा अवधी ११ नोव्हेंबर २०२० पर्यंत देण्यात आला आहे. या कालावधीत रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले नाही. निर्धारित अवधी संपल्यावर देखभाल दुरुस्तीचा कालावधी आहे. परंतु बांधकामच पूर्ण झाले नसल्याने देखभाल दुरुस्तीचा प्रश्नच येत नाही. रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता, असा सवाल गावकरी उपस्थित करीत आहेत. चुल्हाड गावाला जोडणारा मुख्य रस्ता असल्याने रस्ता डांबरीकरणावरून गावकरी संतापले आहेत.
बॉक्स
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कामे लांबणीवर :
सिहोरा परिसरात असणाऱ्या ब्राह्मणटोला, बिनाखी, गोंडीटोला, सुकली नकुल , महालगाव ते गोंडीटोला गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. परंतु एकाही रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. खडीकरणाच्या कामासाठी मुरूम नसल्याचे कंत्राटदार सांगत आहे. महसूल विभागाच्या अधिकार क्षेत्रातील मुरूम खदान असून रॉयल्टीचा ससेमिरा वाचवण्यासाठी कंत्राटदार गावांचे शेजारी मुरुमाचा शोध घेत आहेत. दरम्यान रस्त्याचे बांधकाम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी आंदोलनाच्या भूमिकेत गावकरी आहेत. चुल्हाड ते सुकली नकुल रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. वर्षभरात रस्त्यावर खड्डेच खड्डे तयार झाले आहे. आधी सहा महिन्यांत खड्डे पडले होते. कंत्राटदारांनी देखभाल दुरुस्तीच्या नावावर खड्डे बुजविले आहेत. खड्डे पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. निर्णय व कारवाई गुलदस्त्यात जाणार आहे.
कोट बॉक्स
चुल्हाड सिंदपुरी वाहनी रस्त्याने पायदळ चालणेही मुश्कील झाले आहे. गावातील सिमेंट रस्त्याचे कडेला मुरूम नसल्याने अपघात वाढले असून तत्काळ रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
-गुड्डू शामकुवर, सदस्य, ग्रामपंचायत चुल्हाड