लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र सरकारच्या २०२२ पर्यंत सर्वांना घरकुल या महत्वकांक्षी योजनेंतर्गत घरकुलाचे काम प्राधान्याने पूर्ण करावे त्यासाठी केंद्र सरकारचा निधी कमी पडणार नाही असे खासदार सुनील मेंढे यांनी येथे सांगितले.भंडारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, आमदार डॉ.परिणय फुके, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, उपविभागीय अधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी मनीषा कुरसुंगे उपस्थित होत्या. घरकुलासाठी लागणारी रेती जवळच्या रेतीघाटावरून देण्याच्या सूचना यावेळी खासदारांनी दिल्या. घरकुलासाठी पाच ब्रास पर्यंत विना रॉयल्टी रेती देण्याचे शासनाचे निर्देश असून त्याचे तंतोतंत पालन करावे, असे त्यांनी सांगितले. घरकुलासाठी जागा नसलेल्या लाभार्थ्यांना पंडीत दीनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत जागा घेण्यासाठी ५० हजार रुपये अनुदान देण्याची केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेची माहिती लाभार्थ्यांना व्हावी, त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींनी फलक लावण्याची सूचना त्यांनी केली.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संपूर्ण भंडारा जिल्हा ओडीएफ झाला असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत धारगाव, आंधळगाव, आमगाव, काटेबाम्हणी व मोहगाव या ठिकाणी नवीन ३३, ११ केव्ही उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. तसेच ग्रामीण भागात योग्य दाबाचा वीज पुरवठा करण्यासाठी १०० केव्हीए क्षमतेचे ५४ रोहित्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखाली ३७६५ लाभार्थ्यांना घरगुती वीज जोडणी करण्याचे सांगण्यात आले. यावेळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना, प्रधानमंत्री ग्राम आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, ग्रामीण पेयजल योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मी पानलोट व्यवस्थापन कार्यक्रम, राष्ट्रीय भूमिअभिलेख व्यवस्थापन कार्यक्रम, दिनदयाल उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय स्वास्थ अभियान, सर्व शिक्षा अभियान आदींचा आढावा घेण्यात आला.मुद्रा अंतर्गत ६२.७५ कोटींचे कर्जप्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत या वर्षात ५३०१ प्रकरणात ६२.७५ कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले. या बैठकीत खासदार मेंढे यांनी कर्ज वितरणाचा बँक निहाय आढावा घेतला. मुद्रा योजना ही केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना असून बँकांनी मुद्रा योजनेत जास्तीत जास्त कर्ज वितरीत करण्याचे निर्देश दिले. ५० हजारापर्यंत कर्जासाठी कुठल्याही लाभार्थ्यांना कागदपत्रे मागता कामा नये असे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत १५६६ नवीन घरकुलांचा आराखडा तयार करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. शहरामध्ये या योजनेत मोठ्या प्रमाणात काम होणे गरजेचे असल्याचे खासदार मेंढे यांनी सांगितले. भंडारा शहरात १६ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. घरकुलासाठी नियोजन आवश्यक असल्याचे सांगून गती वाढविण्याचे निर्देश दिले.
घरकुलासाठी केंद्र सरकारचा निधी कमी पडणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 6:00 AM
घरकुलासाठी लागणारी रेती जवळच्या रेतीघाटावरून देण्याच्या सूचना यावेळी खासदारांनी दिल्या. घरकुलासाठी पाच ब्रास पर्यंत विना रॉयल्टी रेती देण्याचे शासनाचे निर्देश असून त्याचे तंतोतंत पालन करावे, असे त्यांनी सांगितले. घरकुलासाठी जागा नसलेल्या लाभार्थ्यांना पंडीत दीनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत जागा घेण्यासाठी ५० हजार रुपये अनुदान देण्याची केंद्र सरकारची योजना आहे.
ठळक मुद्देसंडे अँकर । सुनील मेंढे, जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा