चुल्हाड (सिहोरा) : कोरोना काळात गावाकडे अडकलेल्यांना गावातच रोजगार उपलब्ध करण्यात अपयश आल्यानंतर मजुरांचे लोंढे शहरात रोजगारासाठी धाव घेत आहेत. या मजुरांना कंपन्या गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र मागत असल्याने अडचणीत वाढ झाली आहे. सिहोरा परिसरातील तरुणांनी या प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे.
कोरोना काळात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने मजूर गावाकडे परतले. गावात या मजुरांनी रोजगार शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना गावात बारमाही रोजगार मिळाला नाही. यामुळे जवळ असणारा पैसा संपला. यानंतर आर्थिक अडचणीचा सामना करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. आता बंद असणाऱ्या कंपन्या सुरू झाल्या आहेत. परंतु या कंपन्यात कामगारांचा तुटवडा असल्याने गावातून कामगारांची मागणीही वाढली आहे.
कंपन्यांत रोजगार शोधण्याचा प्रयत्न सुरू केला असता नवीन संकटाने त्यांना ग्रासले आहे. कंपनीत प्रवेश घेताना गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र मागण्यात येत आहे. यामुळे सिहोरा परिसरातील तरुण या प्रमाणपत्रसाठी ऑनलाईन नोंदणी करीत आहेत. यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेत आहेत. या प्रमाणपत्र प्राप्तीकरिता काही दिवसांचा कालावधी लागत आहे.
बॉक्स
तत्काळ प्रमाणपत्र देण्याची गरज
ग्रामीण भागात रोहयोच्या कामांना मंजुरी देण्यात आली नाही. हाताला कामे नसल्याने मजूर व कामगार रोजगारासाठी शहराकडे धाव घेत असून, कंपन्या गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र मागत आहेत. जलद गतीने प्रमाणपत्र देण्यासाठी पोलीस ठाण्यात सोय करण्याची गरज आहे, अशी मागणी बपेरा येथील भाजपा युवा नेते किशोर राहगडाले आणि भाजयुमोचे तालुका उपाध्यक्ष विनोद पटले यांनी केली आहे.