लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार यांनी सोमवारी भंडारा येथे सफाई कामगारांच्यासाठी असलेले विविध शासकीय उपक्रम, योजना व लाड पागे समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी आदी बाबींचा आढावा घेतला.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रदीपकुमार डांगे, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश मेश्राम, नगर पालिका प्रशासन अधिकारी माधुरी मडावी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत सफाई कामगारांच्या सोयी सुविधांच्या बाबतीत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व नगर पालिका प्रशासनाने लाड पागे समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले. लोकसंख्येच्या आधारावर सफाई कर्मचाºयांची संख्या असावी असे सांगून पवार म्हणाले की, ज्या नगर पालिकेत सफाई कर्मचारी पदे रिक्त आहेत, अशा नगर पालिकांनी दोन महिन्याच्या आत पदे भरण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवावा.नगर पालिका प्रशासनाने सफाई कर्मचाºयांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा. सफाई कामगारांच्या कुटूंबियांना घरे बांधून देण्यासाठी नगर पालिकेने कार्यक्रम हाती घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. ज्या कर्मचाºयांच्या वारसाचे अर्ज प्रलंबित आहेत. असे अर्ज तात्काळ निकाली काढावेत, असे ते म्हणाले. सफाई कामगारांना गणवेश उपलब्ध करुन द्यावा असे सांगून पवार म्हणाले की, गणवेश उत्तम दर्जाचा असणे आवश्यक आहे. यासोबतच धुलाई भत्ता व घाण भत्ता वाढवून देण्याचा प्रयत्न सर्व नगर पालिकेने करावा. सफाई कर्मचाºयांच्या सेवा पुस्तकांची महालेखापालाकडून पडताळणी करुन घ्यावी. सफाई कर्मचाºयांना बदली रजा द्यावी. तसेच नगर पालिकेची आर्थिक स्थिती पाहून, वैद्यकीय प्रतिपूर्ती देण्यात यावी, असे ते म्हणाले. समाज कल्याण विभागाने मेहतर समाजातील व्यक्तींना समाज कल्याण विभागाच्या योजनांचा लाभ द्यावा, असे सांगितले. या बैठकीत सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद, समाज कल्याण, महात्मा फुले विकास महामंडळ, यासह सर्व नगर पालिकांमधील योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी विविध विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
सफाई आयोगाच्या अध्यक्षांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:47 PM