भंडारा : रस्ता लवकर बनविण्यात यावा या मागणीला घेऊन काही नागरिकांनी वाहतुकीला अडथळा निर्माण केला, तसेच रास्ता रोको केल्यामुळे तुमसर पोलिसांनी २५ पेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई शनिवारी सकाळी १२ वाजेच्या सुमारास तुमसर शहरातील रविदासनगरात घडली होती. यावेळी संत रविदासनगरात मोठ्या संख्येने महिला व पुरुष या आंदोलनात सहभागी झाले होते.
राज्यमार्ग असलेल्या तुमसर ते बपेरा रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. वारंवार विनंती करूनही रस्त्याची डागडुजीही करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी शनिवारी चक्काजाम आंदोलन करून चार तास वाहतूक रोखून धरली होती. आठवडाभरात रस्ता दुरुस्तीचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, गैरकायद्याची मंडळी जमवून वाहनांना व वाहतुकीला अडथळा निर्माण करून रास्ता रोको केल्यामुळे तुमसर पोलिसांनी २५ पेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यात राजेश भालाधरे, राहुल भालाधरे, सदानंद कनोजे, निशू भोंडेकर, युवराज चोवे, पिंटू जगने, तिलक गजभिये, शेख सलाम तुरक, नावेद शेख, अमृत कनोजे, आशिष गजभिये, पिंटू रडगे, इम्रान तुरक यांच्यासह अन्य १० ते १५ जणांचा समावेश आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.