भंडारा : काहीच दिवसांत लाखनी नगरपंचायतीची निवडणूक लागणार आहे. प्रशासनाकडून प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या पक्षातील वरिष्ठांकडे चकरा वाढल्या आहेत. एकाच प्रभागातून अनेक इच्छुक असल्याने वरिष्ठांची डोकेदुखी वाढली आहे.
पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर कोरोना महामारीमुळे नगरपंचायत निवडणूक लांबणीवर पडली होती. आता सर्वत्र कोरोना नियंत्रणात आल्यामुळे प्रशासन निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. २३ नोव्हेंबरपासून प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे ३० नोव्हेंबरनंतर निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षातील इच्छुक तयारीला लागले आहेत. नुकत्याच आटोपलेल्या दिवाळी सणानिमित्त अनेकांनी जनसंपर्क वाढविण्यासाठी प्रयत्न केला आहे. एकूण १७ सदस्यसंख्या असलेल्या लाखनी नगरपंचायतमध्ये ९ प्रभाग महिला राखीव झाल्याने अनेकांचे गणित बिघडले आहे.
काही प्रभागांमध्ये तर योग्य उमेदवार मिळण्यात अडचणी येत आहेत तर काही ठिकाणी अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याचे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पक्षातील वरिष्ठांची उमेदवार निवडताना डोकेदुखी वाढणार आहे.
स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांनाच पसंती
स्थानिक निवडणूक असल्याने सर्वसामान्य मतदारांचा कल स्वच्छ प्रतिमेच्या आणि प्रसंगी मदतीला धावणाऱ्या उमेदवाराकडे असतो. या निवडणुकीत मतदार पक्षाला हवे तसे महत्त्व देत नाहीत. अशात काही पक्षांसमोर कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या व सर्वसामान्य मतदारांमध्ये स्वच्छ प्रतिमा उमेदवारांनाच संधी देण्याचे आव्हान आहे.
मतदार यादी कार्यक्रम
प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे : २३ नोव्हेंबर २०२१
- प्रारूप मतदार यादीवर सूचना व हरकती : २३ ते २६ नोव्हेंबर २०२१
- अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे : २९ नोव्हेंबर २०२१
- मतदार केंद्रांची यादी व प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे : ३० नोव्हेंबर २०२१