: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन
चुल्हाड (सिहोरा) : महाशिवरात्रीनिमित्त देवस्थानमध्ये भाविकांची गर्दी उसळत असल्याने कोरोनाच्या सावटात तुमसर तालुक्यातील चांदपूर जागृत हनुमान देवस्थान पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे सचिव तुलाराम बागडे यांनी ‘लोकमत’ला दिली.
चांदपूर येथील जागृत हनुमान देवस्थानात दर दिवशी भाविकांची रेलचेल राहत आहे. सणासुदीच्या पावन पर्वावर भाविकांच्या गर्दीत वाढ होत आहे. लांब पल्ल्यातून एक दिवस आधीच भाविक हजेरी लावत आहेत. यामुळे गर्दीला नियंत्रित करण्यासाठी ट्रस्टला कसरत करावी लागत आहे. सणासुदीला आयोजित यात्रांना आधीच ब्रेक लावण्यात आलेला आहे. कोरोना विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी ट्रस्टच्या वतीने सुरुवातीपासून शासनाच्या गाइडलाइन्सचे पालन करण्यात येत आहे. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम लागू करण्यात आले आहेत. लहान बालके, वयोवृद्ध नागरिक, गर्भवती महिलांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. याशिवाय देवस्थानात प्रवेश करताना भाविकांना अंतर ठेवण्याचे सांगण्यात येत आहे. भाविक सूचनांचे पालन करीत आहेत की नाही हे पाहण्यासाठी स्वयंसेवकांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. यामुळे गर्दी टाळण्यात येत असून, देवस्थान परिसरात असणाऱ्या व्यावसायिकांनाही सूचनांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, देवस्थान परिसरात असणारी पार्किंग व्यवस्था बंद करण्यात आली असून, थेट देवस्थानात जाणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. सण आणि यात्रा उत्सवात भाविकांच्या वाढत्या गर्दीवर ट्रस्टच्या वतीने करडी नजर ठेवली जात आहे. महाशिवरात्रीनिमित्त देवस्थानात यात्रेचे आयोजन करण्यात येत नाही. परंतु भाविक आराध्य दैवताचे दर्शन घेण्यासाठी देवस्थानात गर्दी करीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना विषाणू पादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील यात्रा, उत्सव रद्द केले आहेत. यामुळे या उपक्रमात सहभाग घेत देवस्थान ट्रस्टने चांदपूरचे जागृत हनुमान देवस्थान सलग पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देवस्थानात भाविकांना दर्शन बंद करण्यात आले आहे. या आशयाचे फलक देवस्थान परिसरात लावण्यात आले आहेत. ही प्रक्रिया आठवडाभरापूर्वीच करण्यात आली आहे. यामुळे माहिती भाविकांना सोईची ठरणार आहे.
बॉक्स
ग्रीन व्हॅली पर्यटनस्थळ नियंत्रणाबाहेर
ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळ विकसित करण्यात आले नाही. गेल्या १५ वर्षांपासून निधी थकला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळच्या अखत्यारीत पर्यटन विकासाचे तुणतुणे वाजविले जात आहे. परंतु साधी एक वीट पोहोचली नाही. विकास गर्भातच आटला असला तरी पर्यटनस्थळात पर्यटक हजेरी लावत आहेत. पर्यटनस्थळावर कुणाचे नियंत्रण नाही. पर्यटनस्थळात कोरोना विषाणू पादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या गाइडलाइनला थारा नाही. नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणारी यंत्रणा नाही. पर्यटनस्थळ नियंत्रणाबाहेर असल्याने पर्यटक सैरभैर कारभार करीत आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कुणीही नियम पाळायला तयार नाही.
महाशिवरात्री यात्रेनिमित्त चांदपूरच्या जागृत हनुमान देवस्थानात भाविक दर्शनासाठी हजेरी लावत आहेत. गर्दी वाढती असल्याने कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार होण्याची भीती आहे. जिल्हाधिकारी यांनी यात्रा, उत्सवाच्या संदर्भात आदेश काढले असून, पाच दिवस देवस्थान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांनी याची नोंद घ्यावी.
- अजय खंगार, अध्यक्ष, देवस्थान ट्रस्ट चांदपूर