मोहाडी : उन्हाळी धान विक्री करण्याची ऑनलाईन नोंदणी कोणत्याही केंद्रावर करता येईल. मात्र, ३१ मेपर्यंत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचे धान ज्या केंद्राला गाव जोडले असेल त्याच केंद्रावर धान खरेदी करण्यात येणार आहे. तथापि, खरीप हंगाम २०२० - २१ धानाची उचल न झाल्यामुळे गोदामाअभावी मोहाडी व मोहगाव देवी केंद्रात बदल झाल्याची माहिती मोहाडी खरेदी समितीचे अध्यक्ष माधवराव बांते यांनी दिली.
मोहाडी तालुका शेतकी खरेदी - विक्री समितीचे अध्यक्ष माधवराव बांते यांनी जिल्हा पणन अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला होता. त्या पत्राची दखल पणन अधिकाऱ्यांनी घेतली. मोहाडी तालुका शेतकी खरेदी - विक्री समिती, मोहाडी यांचे धान खरेदी केंद्र मोहाडी व मोहगाव देवी येथील खरीप हंगाम २०२० - २१मध्ये ७ महिन्यांपासून खरेदी केलेल्या धानाची उचल न झाल्यामुळे रब्बी (उन्हाळी) धान खरेदीचा प्रश्न गोदाम उपलब्धतेअभावी निर्माण झाला. त्यामुळे आधारभूत किंमत धान खरेदी योजना रब्बी (उन्हाळी) हंगाम २०२० - २१करिता मोहाडी व मोहगाव देवी हे धान खरेदी केंद्र सुरू करता येणे शक्य नाही.
मोहाडी या केंद्राला संलग्न असलेल्या गावातील शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, याकरिता मोहाडी केंद्राअंतर्गत येणारी गावे मोहाडी, कळमना, वडेगाव, महालगाव, मोरगाव, सिरसोली या गावातील शेतकऱ्यांचे धान स्व. सुमित्राबाई सुशि बेरो. सेवा सह. संस्था, टांगाचे धान खरेदी केंद्र, डोंगरगाव येथे खरेदी करावयाचे आहे. तसेच मोहगाव देवी केंद्राअंतर्गत येणारी गावे मोहगाव देवी, दहेगाव, पारडी, खोडगाव या गावातील शेतकऱ्यांचे धान, बाबा शेतकरी सुशि बेरो. सेवा सह. संस्था, वरठी येथे धान खरेदी करावयाचे आहे. संबंधित संस्थांनी व शेतकऱ्यांनी झालेल्या बदलाची नोंद घ्यावयाची आहे, असे पणन अधिकाऱ्यांनी २४ मे रोजीच्या पत्रातून कळविले आहे. तसेच ३१ मे २०२१पूर्वी संबंधित गावातील शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करून त्यानंतर शेड्यूलिंग पद्धतीनुसार पुढील धान खरेदी प्रक्रिया राबविण्यात यावी.