लाखांदूर :
पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या चारही जिल्ह्यांचे तीर्थस्थान म्हणून ओळखले जाणारे तालुक्यातील पुयार/ चारभट्टी येथील जागृत हनुमान देवस्थान येथे दरवर्षी मोठ्या उत्साहाने रामनवमी जन्मोत्सव यात्रा भरते. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा २१ एप्रिल रोजी होणारी श्रीराम जन्मोत्सव यात्रा रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे सर्व भाविकभक्तांनी चारभट्टी येथे न येता आपापल्या घरीच राम जन्मोत्सव साजरा करण्याचे आवाहन येथील मंदिर प्रशासनाने केला आहे.
तालुक्यापासून जवळपास दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चारभट्टी/ पुयार येथे हनुमान देवस्थान आहे. घनदाट जंगलात असलेले हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या देवस्थानाची ख्याती परिसरात व लगतच्या जिल्ह्यात आहे. त्यामुळे वर्षभर पूजा करण्यास भाविकांची सतत ये-जा सुरू असते.
चैत्र महिन्यांपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते.
नववर्षात पहिल्याच महिन्यात गुढीपाडवा, रामनवमी नंतर येणारा सण म्हणजे हनुमान जयंती होय. या रामनवमी व हनुमान जयंतीच्या दिवशी भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या सीमेलगत असणाऱ्या देवस्थानात दोन्ही जिल्ह्यांतील भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येतात.
यात्रेनिमित्त विविध साहित्याची दुकाने लागतात.
येथे गेल्यानंतर हनुमान जन्माबद्दलच्या अनेक पौराणिक कथा ऐकायला मिळतात. हनुमान भगवान शिवाचा रुद्रावतार समजला जातो. त्यासोबतच पवनपुत्र बजरंगबली तर महाराष्ट्रात मारुती या नावाने संबोधले जाते.
या देवस्थानाद्वारे बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत. त्यामुळे दरवर्षी येणाऱ्या भाविकांची संख्या सतत वाढत आहे. मात्र, यंदा कोरोना विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी येथे भरविण्यात येणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला असून भाविकांनी चारभट्टी येथे न येण्याचे आवाहन देखील केले आहे.