कोरोना काळामध्ये विद्युत विभागाने रिडींग न घेता विद्युत देयक ग्राहकाला पाठविले. त्यामुळे अनेकांना वाजवीपेक्षा जास्त विद्युत बिल पाठविण्यात आले आहे. देयक कमी करण्यासाठी चितापूर येथील असलेल्या विद्युत कार्यालयांमध्ये गेले असता साहेब वेळेवर हजर नसल्याने ग्राहकांना परत जावे लागते. येथील कार्यालयाचा कारभार प्रभारी अभियंत्याकडे असल्याने ते वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे या कार्यालयामध्ये कायमस्वरूपी अभियंता नियुक्त करण्याची मागणी परिसरातील जनतेने केली आहे. वाढीव बिल कमी करण्याकरिता भंडाऱ्याला गेले असता तेथून प्रतिसाद मिळत नाही. धारगाव, चितापूर, चांदोरी, गुंथारा, आमगाव दिघोरी येथील ग्राहकांना कायमस्वरूपी अभियंता नसल्याने फार त्रास सहन करावा लागत आहे . तसेच नवीन विद्युत मीटर बसविण्याकरिता डिमांड भरण्यासाठी कार्यालयात ग्राहकांना चकरा माराव्या लागत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना असून सुद्धा ते या उपकेंद्रामध्ये कायमस्वरूपी अभियंत्याची नियुक्ती करण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे या केंद्रात लवकरात लवकर कायमस्वरूपी अभियंता देण्याची मागणी परिसरातील जनतेने केली आहे. आता नव्याने चितापूर येथे विद्युत सबस्टेशन तयार करण्यात आले आहे. कार्यालयासाठी नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले आहे. मात्र कायमस्वरूपी अभियंता नसल्याने कार्यालय ओस पडले आहे.
चितापूर येथील विद्युत उपकेंद्राचा कारभार प्रभारीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 4:29 AM