राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : स्वस्त धान्य दुकानातून मिळणारी तुळडाळ बाजारभावापेक्षा महाग असल्याने शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी तुरडाळीकडे पाठ फिरविली होती. परिणामी गोदामात पडून असलेल्या तुरडाळीचा प्रश्न सतावत असल्याने शासनाने यापूर्वी ५५ रूपयात मिळणाऱ्या तुरडाळीच्या दरात २० रूपयाने कपात केली असून ५५ रूपये किलोने मिळणारी तुरडाळ आता ३५ रूपये किलो दराने मिळणार आहे.राज्यात मागीलवर्षी तुरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले होते. त्यामुळे शासनाने तुर डाळीची हमी भावाने खरेदी केली होती. अपेक्षेच्या तुलनेत भरमसाठ उत्पादन झाल्याने शासकीय गोदामे भरली होती. शासकीय केंद्रात खरेदी करण्यात आलेल्या डाळीची भरडाई व पॅकींग करून ती स्वस्त धान्य दुकानात ५५ रूपये किलो दराने उपलब्ध करून देण्यात आली होती. स्वस्त धान्य दुकानात तुर डाळ विक्रीला येण्याच्या वेळेत बाजारातील डाळीच्या दरात घसरण झाली. परिणामी स्वस्त धान्य दुकानातून मिळणारी तुर डाळ महाग व बाजारातील डाळ स्वस्त असे चित्र निर्माण झाल्याने शिधापत्रिका धारकांनी स्वस्त दुकानातील तुर डाळीकडे पाठ फिरविली होती. त्यामुळे खरेदी केलेली तुर डाळ शासकीय गोदामातच पडून होती. त्या शिल्लक डाळीचे करणार काय? असा प्रश्न उपस्थित होताच तुर डाळीच्या दरात २० रूपयांनी कपात करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.तुर डाळीचा लाभ अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे. तुमसर तालुक्यात विविध योजनेतील ४२ हजार शिधापत्रिकाधारक लाभार्थी आहेत.गोदामात यापूर्वी शिल्लक असलेली १०० क्विंटल तुर डाळ व आता प्राप्त झालेली तुर डाळ १७० क्विंटल असे एकूण २७० क्विंटल तुर डाळीचा साठा उपलब्ध आहे. मागणी ४२० क्विंटलची आहे. त्यामुळे सर्व शिधापत्रिकाधारकांना तुर डाळ वाटप करण्याचा शासनाचा निर्णय असला तरी ते शक्य होणार नाही. परिणामी अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनाच ३५ रूपये किलो दराने तुर डाळ वितरीत करण्यात येणार आहे. उर्वरीत शिधापत्रिकाधारकांना हा तुर डाळ मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.तुर डाळीच्या दरात कपात करण्यात आल्याचे शासन निर्णय प्राप्त झाले आहे. उपलब्ध साठ्यानुसार अंत्योदय शिधापत्रिका धारकांना प्रती शिधापत्रिका याप्रमाणे १ किलो तुर डाळीचे वाटप जुलै महिन्यात होत आहे.- गजेंद्र बालपांडे, तहसीलदार, तुमसर.
आता स्वस्त धान्य दुकानातून ३५ रुपयाला तुरडाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 10:00 PM
स्वस्त धान्य दुकानातून मिळणारी तुळडाळ बाजारभावापेक्षा महाग असल्याने शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी तुरडाळीकडे पाठ फिरविली होती. परिणामी गोदामात पडून असलेल्या तुरडाळीचा प्रश्न सतावत असल्याने शासनाने यापूर्वी ५५ रूपयात मिळणाऱ्या तुरडाळीच्या दरात २० रूपयाने कपात केली असून ५५ रूपये किलोने मिळणारी तुरडाळ आता ३५ रूपये किलो दराने मिळणार आहे.
ठळक मुद्देजुलैपासून अंमलबजावणी : अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनाच मिळणार लाभ